Device for Cerebral Palsi Patients | विद्यार्थिनीने बनवले सेरेब्रल पाल्सीच्या रुग्णांसाठी उपकरण 
विश्वसंचार

Device for Cerebral Palsi Patients | विद्यार्थिनीने बनवले सेरेब्रल पाल्सीच्या रुग्णांसाठी उपकरण

पुढारी वृत्तसेवा

टोरांटो : जगभरात सुमारे १.८ कोटी लोक सेरेब्रल पाल्सी या आजारासोबत जीवन जगत आहेत. ही स्थिती शरीराच्या हालचाली आणि स्नायूंच्या नियंत्रणावर विपरीत परिणाम करते, ज्यामुळे दैनंदिन कामे करणे कठीण होऊन बसते. विशेषतः ज्यांच्या हाताची हालचाल मर्यादित असते, त्यांच्यासाठी ब्रश पकडणे, लिहिणे किंवा टचस्क्रीन वापरणे हे देखील एक मोठे आव्हान असते. या समस्येचे गांभीर्य ओळखून कॅनडातील विद्यार्थिनी लियाना जेनोवेस हिने वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी एक असे असिस्टिव्ह डिव्हाईस तयार केले, जे आज जगभरातील २६ देशांमध्ये पोहोचले आहे.

लियानाने हे डिव्हाईस मॅकमास्टर युनिव्हर्सिटीमध्ये बायोमेडिकल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना विकसित केले. पहिल्या वर्षाच्या डिझाईन प्रोजेक्टदरम्यान, हातांच्या सूक्ष्म हालचालींवर नियंत्रण ठेवण्यास त्रास होणाऱ्या लोकांसाठी काहीतरी उपयुक्त बनवण्याची तिची इच्छा होती. या प्रोजेक्टदरम्यान तिची भेट सेरेब्रल पाल्सीने ग्रस्त असलेल्या ‘एलिसा’ नावाच्या महिलेशी झाली. एलिसाला पेंटिंगची आवड होती, मात्र हातावरील नियंत्रण कमी झाल्यामुळे तिला पेंटब्रश वापरणे कठीण जात होते. या भेटीतून प्रेरणा घेऊन लियानाने बोटांच्या अत्यंत सूक्ष्म हालचालींवर अवलंबून राहावे लागणार नाही, अशा उपकरणावर काम करण्यास सुरुवात केली. लियानाचा पहिला प्रोटोटाईप कोणत्याही महागड्या लॅबमध्ये तयार झालेला नव्हता.

तिने स्ट्रॉ, पाईप क्लिनर आणि स्पंज यांसारख्या अत्यंत साध्या वस्तूंच्या मदतीने पहिले मॉडेल बनवले. यानंतर तिने एलिसाकडून याची चाचणी घेतली आणि तिच्या फीडबॅकच्या आधारे डिझाईनमध्ये सतत सुधारणा केली. अनेक प्रयत्नांनंतर हे डिव्हाईस अधिक आरामदायक आणि उपयुक्त बनवण्यात आले. याच सुरुवातीच्या प्रयोगाचे रूपांतर पुढे ‘गाईडेड हँड्स’ या तंत्रज्ञानामध्ये झाले. हे डिव्हाईस अधिक उत्तम बनवण्यासाठी लियानाने कॅनडातील १५० हून अधिक रुग्ण, न्यूरोलॉजिस्ट आणि ऑक्युपेशनल थेरपिस्ट यांच्याशी संपर्क साधून त्यांचा सल्ला घेतला. नंतर जेव्हा तिने ‘बेला’ नावाच्या सेरेब्रल पाल्सीग्रस्त मुलीला या उपकरणाद्वारे लिहिताना, रंग भरताना आणि आयपॅडवर गेम खेळताना पाहिले, तेव्हा तिच्या या प्रोजेक्टमुळे हजारो लोकांचे आयुष्य सोपे होऊ शकते यावर तिचा विश्वास ठाम झाला.

‘गाइडेड हँड्स’ कसे काम करते?

‘गाइडेड हँड्स’चा मुख्य उद्देश हातांच्या बारीक हालचालींऐवजी शरीराच्या मोठ्या हालचालींचा वापर करून काम करणे सोपे बनवणे हा आहे. यामध्ये ३डी प्रिंटरच्या हालचालींवर आधारित एक स्लाइडिंग मॅकेनिझम आहे. याच्या हँडपीसमध्ये पेंटब्रश, पेन, पेन्सिल, मार्कर आणि स्टायलस यांसारखी वेगवेगळी साधने सहज जोडता येतात. यामुळे मर्यादित हालचाल असलेले लोक कागदावर किंवा स्क्रीनवर अधिक नियंत्रित पद्धतीने पेन किंवा ब्रश फिरवू शकतात. याद्वारे रुग्ण चित्रकला, लिखाण, रंग भरणे आणि आयपॅड किंवा टचस्क्रीन डिव्हाइस वापरण्यासारख्या सर्व गोष्टी सहज करू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT