कॅनबेरा : धूम्रपान करणे हे आरोग्यासाठी हानीकारक आहे, असे कानीकपाळी ओरडून सांगितल्यावरही अनेक लोक सिगारेट ओढतच असतात. भरीत भर म्हणजे सिगारेट प्यायल्यानंतर हे लोक अनेकदा त्याची थोटके (बड्स) रस्ते किंवा फूटपाथवरच फेकून देतात. या थोटकांमध्ये असलेले प्लास्टिकचे फिल्टर वर्षानुवर्षे नष्ट न होता तसेच राहतात. ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांनी सिगारेटच्या या कचऱ्याचा निचरा करण्यासाठी एक अनोखा उपाय शोधून काढला आहे. मेलबर्नच्या RMIT युनिव्हर्सिटीच्या अभियंत्यांनी सिगारेटच्या कचऱ्याचा वापर रस्ते बनवण्यासाठी करून पर्यावरणाच्या रक्षणासाठी एक नवीन दिशा दाखवली आहे. युनिव्हर्सिटीने दिलेल्या माहितीनुसार, संशोधकांनी सिगारेटच्या थोटकांना डांबरामध्ये (Asphalt) सील करण्याची अशी पद्धत विकसित केली आहे, ज्यामुळे त्यांचे रूपांतर रस्ते बनवण्याच्या साहित्यात होऊ शकते.
यामध्ये सिगारेटच्या थोटकांना डांबरी काँक्रीटमध्ये मिसळण्यापूर्वी त्यांच्यावर बिटुमेन (Bitumen) किंवा पॅराफिन मेणाचा (Paraffin Wax) थर चढवण्यात आला. फिल्टरमधील घातक रसायने बाहेर पडू नयेत म्हणून ही प्रक्रिया करण्यात आली. प्रयोगशाळेत केलेल्या चाचण्यांवरून असे दिसून आले की, योग्य प्रमाणात कोटिंग केलेल्या सिगारेटच्या थोटकांपासून बनवलेले डांबर हे सतत जड वाहतूक असणाऱ्या रस्त्यांच्या गरजा पूर्ण करू शकते. तसेच, याची थर्मल कंडक्टिव्हिटी (उष्णता वहन क्षमता) पारंपरिक डांबरापेक्षा कमी असते. सिगारेटची थोटके ‘सेल्युलोज ॲसिटेट’पासून बनलेली असतात, जो एका प्रकारचा प्लास्टिकच आहे. हे सहजासहजी नष्ट होत नाही. याशिवाय फिल्टरमध्ये निकोटिन, जड धातू आणि तंबाखू व सिगारेटच्या धुरातील उरलेली रासायनिक अवशेष असू शकतात.
यावर मात करण्यासाठी डांबरामध्ये वापरण्यापूर्वी सिगारेटच्या थोटकांना सील करण्याच्या पद्धतीची चाचणी घेण्यात आली. संशोधकांनी फिल्टरवर बिटुमेन किंवा पॅराफिन मेणाचा थर दिला. यामुळे फिल्टरवर असा एक संरक्षक थर तयार झाला, जो पाणी किंवा इतर द्रव्यांच्या संपर्कात आल्यावर या घातक रसायनांना बाहेर पडण्यापासून रोखण्यास मदत करतो. ‘कन्स्ट्रक्शन अँड बिल्डिंग मटेरियल्स’मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासाच्या निष्कर्षांनुसार, थर दिलेल्या या थोटकांमुळे डांबराची घनता कमी झाली आणि त्याची सच्छिद्रता वाढली. या बदलांमुळे डांबराची उष्णता शोषून घेण्याची आणि ती पसरवण्याची क्षमता कमी होण्यास मदत झाली. यामुळे शहरांमधील वाढत्या तापमानाच्या समस्येशी लढण्यासही मदत होऊ शकते; कारण सामान्य डांबर सूर्याची उष्णता मोठ्या प्रमाणावर शोषून घेते आणि धरून ठेवते, ज्यामुळे शहरांचे तापमान वाढते.