Stormwall Project | सौर वादळांपासून पृथ्वीच्या रक्षणासाठी ‘स्टॉर्मवॉल’ प्रकल्प  
विश्वसंचार

Stormwall Project | सौर वादळांपासून पृथ्वीच्या रक्षणासाठी ‘स्टॉर्मवॉल’ प्रकल्प

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : सूर्याकडून येणाऱ्या विनाशकारी ‘सुपरस्टॉर्म’ (प्रचंड सौर वादळे) पासून पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी संशोधकांनी ‘स्टॉर्मवॉल’ नावाच्या एका अनोख्या उपग्रह समूहाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. हे संकट रोखण्यासाठी सध्या आपल्याकडे कोणतीही सक्षम यंत्रणा उपलब्ध नाही. ही नावीन्यपूर्ण संकल्पना पृथ्वीच्या समोर एका अवाढव्य ‘एअरबॅग’सारखे काम करेल. यामुळे भविष्यात होणारे ट्रिलियन (अब्जावधी) डॉलर्सचे संभाव्य नुकसान टाळता येऊ शकते आणि हा प्रकल्प ‘पूर्णपणे व्यवहार्य’ आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

गेल्या काही वर्षांत, सूर्याच्या अंदाजे ११ वर्षांच्या चक्रातील सर्वात सक्रिय टप्प्यामुळे (ज्याला ‘सोलर मॅक्सिमम’ म्हणतात) पृथ्वीला डझनभर सूर्य वादळांचा सामना करावा लागला आहे. सूर्याच्या पृष्ठभागावर होणाऱ्या मोठ्या स्फोटांमुळे (ज्याला ‘सोलर फ्लेअर्स’ म्हणतात) प्लाझ्माचे मोठे ढग बाहेर पडतात, ज्यांना ‘कोरोनल मास इजेक्शन’ म्हटले जाते. या प्रक्रियेतूनच ही वादळे निर्माण होतात. जर असे वादळ आजच्या काळात पृथ्वीवर धडकले, तर ते पृथ्वीभोवती फिरणारे सर्व उपग्रह नष्ट करू शकते. अंतराळवीरांना जीवघेण्या रेडिएशनचा (किरणोत्सर्ग) धोका निर्माण करू शकते. वीजपुरवठा यंत्रणा (पॉवर ग्रिडस्‌) कोलमडवून टाकू शकते.

जगभरातील इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प करू शकते. सध्या अशा महावादळाचा सामना करण्यासाठी आपल्याकडे फक्त एकच मार्ग आहे, तो म्हणजे त्यांचे अचूक भाकीत करणे आणि अंतराळयाने तसेच जमिनीवरील पायाभूत सुविधांचा बचाव करण्यासाठी आधीच तयारी करणे. मात्र, ‘स्पेस वेदर’ या जर्नलमध्ये २ जून रोजी प्रसिद्ध झालेल्या एका नवीन संशोधनात या समस्येवर अधिक आक्रमक आणि प्रतिबंधात्मक उपाय सुचवण्यात आला आहे. या नवीन संशोधन पत्रिकेत संशोधकांनी पृथ्वीपासून सुमारे २२,५०० मैल (३६,००० किलोमीटर) उंचीवर भू-स्थिर कक्षेत बसच्या आकाराचे ६ उपग्रह प्रक्षेपित करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

ही उंची आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक आणि इतर बहुतांश उपग्रहांच्या कक्षेपेक्षा बरीच जास्त आहे. हा उपग्रहांचा समूह तिथे तैनात राहून पुढील मोठ्या वादळाची वाट पाहिल. जेव्हा एखादे महावादळ पृथ्वीच्या दिशेने येताना दिसेल, तेव्हा हे उपग्रह पृथ्वीच्या अदृश्य चुंबकीय ढालीच्या कडेला असलेल्या गॅसचे मोठे कंटेनर्स रिकामे करतील. या गॅसमुळे तिथे प्लाझ्माची एक अवाढव्य भिंत तयार होईल, जी बाहेरून येणाऱ्या विनाशकारी सीएमई वादळाचा वेग मंदावेल आणि त्याचा मार्ग बदलून पृथ्वीचे रक्षण करेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT