Stonehenge stones | स्टोनहेंजचे दगड हिमनद्यांनी नव्हे, मानवांनीच आणले! Image Hans Elbers
विश्वसंचार

Stonehenge stones | स्टोनहेंजचे दगड हिमनद्यांनी नव्हे, मानवांनीच आणले!

पुढारी वृत्तसेवा

लंडन: दक्षिण इंग्लंडमधील ‘स्टोनहेंज’ या 5,000 वर्षे जुन्या ऐतिहासिक स्मारकाबाबत शास्त्रज्ञांनी एक मोठा खुलासा केला आहे. एका नवीन संशोधनानुसार, या स्मारकासाठी वापरलेले महाकाय दगड हिमनद्यांच्या नैसर्गिक प्रवाहाने आले नसून, ते मानवांनीच शेकडो मैल दूरवरून वाहून आणले होते, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

दशकांपासून शास्त्रज्ञांमध्ये असा वाद होता की, वेल्स आणि स्कॉटलंडमधून हे दगड सॅलिसबरी प्लेनपर्यंत कसे पोहोचले? काही तज्ज्ञांच्या मते, हिमयुगातील ग्लेशियर्स म्हणजेच हिमनद्यांनी हे दगड नैसर्गिकरीत्या वाहून आणले असावेत, ज्याला ‘ग्लेशियल ट्रान्सपोर्ट थिअरी’ म्हटले जाते. मात्र, ‘कम्युनिकेशन्स अर्थ अँड एन्व्हायर्नमेंट’ या शोधपत्रिकेत 21 जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या अभ्यासाने हा दावा फेटाळून लावला आहे. ऑस्ट्रेलियातील कर्टिन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी स्टोनहेंज परिसरातील नद्यांच्या गाळातील ‘झिरकॉन’ आणि ‘अ‍ॅपेटाइट’ या सूक्ष्म खनिजांचे विश्लेषण केले.

या खनिजांच्या वयाची तुलना केली असता, ती वेल्स किंवा स्कॉटलंडमधील खडकांशी जुळली नाहीत. उलट, ही खनिजे स्थानिक खडकांचेच अवशेष असल्याचे स्पष्ट झाले. जर हिमनद्यांनी हे दगड आणले असते, तर वाटेत त्या खडकांचे सूक्ष्म कण सॅलिसबरी प्लेनमध्ये विखुरलेले आढळले असते. मात्र, तसे कोणतेही पुरावे सापडले नाहीत. या संशोधनामुळे एक आश्चर्यकारक सत्य समोर आले आहे. स्टोनहेंजमधील ‘ब्लूस्टोन्स’ हे सुमारे 225 किलोमीटर लांब असलेल्या वेल्समधून आणले गेले होते. त्याहून अधिक थक्क करणारी बाब म्हणजे, मधील ‘अल्टर स्टोन’ हा उत्तर इंग्लंड किंवा स्कॉटलंडमधून आणला असावा, ज्याचे अंतर किमान 500 किलोमीटर आहे.

संशोधक अँथनी क्लार्क यांच्या मते, ‘आमच्या अभ्यासाने अत्याधुनिक ‘मिनरल फिंगरप्रिंटिंग’ तंत्राचा वापर करून दगडांच्या मूळ स्थानाचा शोध घेतला आहे. हिमनद्या दक्षिण इंग्लंडपर्यंत पोहोचल्याच नव्हत्या, याचा अर्थ हे सहा टनांचे दगड मानवांनीच जमीन आणि कदाचित बोटींच्या सहाय्याने येथे आणले होते.’ हे संशोधन सिद्ध करते की, 5,000 वर्षांपूर्वीच्या मानवाकडे अत्यंत प्रगत अभियांत्रिकी कौशल्य आणि संघटन शक्ती होती. नैसर्गिक मदतीशिवाय केवळ स्वतःच्या कष्टाने आणि नियोजनाने त्यांनी हे महाकाय दगड इतक्या लांबून आणून हे भव्य स्मारक उभे केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT