Stone Age Children | पाषाणयुगीन मुलांनीही साकारल्या होत्या कलाकृती 
विश्वसंचार

Stone Age Children | पाषाणयुगीन मुलांनीही साकारल्या होत्या कलाकृती

पुढारी वृत्तसेवा

जेरुसलेम : कला आणि सर्जनशीलतेचा वारसा केवळ आधुनिक मानवापुरता मर्यादित नाही, तर हजारो वर्षांपूर्वीच्या पाषाणयुगीन मुलांनीही कलाकृती घडवण्यात सहभाग घेतल्याचे पुरावे समोर आले आहेत. सध्याच्या इस्रायलमध्ये सापडलेल्या सुमारे १५ हजार वर्षांपूर्वीच्या मातीच्या मूर्तींवर प्रौढ व्यक्तींसोबत लहान मुलांच्या बोटांचे ठसेही आढळले आहेत. या शोधामुळे पाषाणयुगात मोठी माणसे मुलांना मातीपासून मूर्ती तयार करण्याची आणि त्यांना आकार देण्याची कला शिकवत असावीत, असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. हे संशोधन ‘प्लॉस वन’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले.

जेरुसलेममधील हिब्रू विद्यापीठाचे पुरातत्त्वशास्त्रज्ञ लॉरेंट डेव्हिन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा अभ्यास केला. सुरुवातीला संशोधकांचा उद्देश शेतीचा उदय होण्यापूर्वी लेव्हंट प्रदेशातील नटुफियन संस्कृतीमध्ये मातीपासून कलाकृती तयार केल्या जात होत्या का, हे तपासण्याचा होता. सुमारे १४ हजार वर्षांपूर्वी या प्रदेशात शिकारी आणि अन्न गोळा करून उदरनिर्वाह करणाऱ्या समुदायांनी पहिल्या कायमस्वरूपी वसाहती स्थापन केल्या होत्या. संशोधकांनी १५ हजार ते ११ हजार ६०० वर्षांपूर्वीच्या तीन नटुफियन पुरातत्त्वीय स्थळांवरून गोळा केलेल्या सुमारे ४० किलो मातीचे परीक्षण केले. हजारो मातीच्या तुकड्यांमधून त्यांना मूर्तींचे सुमारे १५० अवशेष सापडले. त्यापैकी १५ मूर्ती पक्षी, हरीण आणि मानवाच्या आकृती म्हणून ओळखता आल्या. विशेष म्हणजे, यातील सुमारे ६० तुकड्यांवर मातीला दाब देताना किंवा आकार देताना उमटलेले बोटांचे ठसे जतन झाले होते.

दहा वर्षांखालील मुलांचाही सहभाग बोटांच्या ठशांमधील रेषांमधील अंतराचा अभ्यास करून संशोधकांनी ते ठसे कोणत्या वयोगटातील व्यक्तींचे असावेत, याचा अंदाज लावला. त्यानुसार, बहुतांश मूर्ती महिला आणि मुलांनी तयार केल्या असाव्यात. काही ठसे दहा वर्षांपेक्षाही कमी वयाच्या मुलांचे असल्याचे दिसून आले. पुरुषांचे ठसे मात्र तुलनेने कमी आढळले. एका छोट्या मानवी मूर्तीच्या धडावर प्रौढ व्यक्ती आणि लहान मुलाचे अशा दोघांचेही बोटांचे ठसे आढळले. यावरून मूर्ती तयार करताना प्रौढ व्यक्ती आणि मूल यांनी एकत्र काम केले असावे. कदाचित मोठ्या व्यक्तीने मुलाला मातीला आकार देण्याची पद्धत शिकवली असावी, असा संशोधकांचा अंदाज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT