नवी दिल्ली : ‘पोट ठीक, तर आरोग्य ठीक’ ही जुनी म्हण आजच्या काळात अधिक महत्त्वाची ठरत आहे. वैद्यकीय अहवालानुसार, जगभरात पोटाशी संबंधित विकारांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. विशेषतः, पोटाच्या कर्करोगामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण वाढत असून, तज्ज्ञांनी याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालानुसार, कोलोरेक्टल कॅन्सर (मोठ्या आतड्याचा कर्करोग) हा जगातील तिसरा सर्वात सामान्य कर्करोग आहे. एकूण कर्करोगाच्या प्रकरणांपैकी 10 टक्के रुग्ण याच आजाराचे असतात. धक्कादायक बाब म्हणजे, कर्करोगामुळे होणार्या मृत्यूंच्या कारणांमध्ये हा दुसर्या क्रमांकावर आहे. पूर्वी हा धोका 50 वर्षांवरील व्यक्तींमध्ये अधिक होता. परंतु, आता तरुण पिढीही याची बळी ठरत आहे. कोलोरेक्टल कॅन्सरची सुरुवात मोठ्या आतड्यात किंवा मलाशयात होते.
याची काही प्रमुख लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत : शौचाच्या सवयींमध्ये अचानक बदल होणे, शौचातून रक्त येणे, पोटात वारंवार तीव्र वेदना होणे. तज्ज्ञांच्या एका पथकाने नुकताच एक खळबळजनक खुलासा केला आहे. ज्या लोकांना ‘इंफ्लेमेटरी बाऊल डिजीज’ (IBD) ही समस्या असते, त्यांच्यामध्ये पुढे जाऊन ‘बाऊल कॅन्सर’ (कोलोरेक्टल कॅन्सर) होण्याचा धोका 600 टक्क्यांनी जास्त असू शकतो. ‘ज्या रुग्णांची वैद्यकीय पार्श्वभूमी तपासली गेली, त्यातील बहुतांश लोकांना 50 वर्षांच्या आधीपासून पोटाच्या काही सामान्य तक्रारी होत्या, ज्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले होते.’ असे तज्ज्ञांचे मत आहे.
पुढील लक्षणे ‘इंफ्लेमेटरी बाऊल डिजीज’ चे संकेत असू शकतात : वारंवार जुलाब किंवा बद्धकोष्ठता होणे, पोटात सतत पेटके येणे किंवा तीव्र वेदना होणे, वारंवार शौचास जावे लागणे, कारणाशिवाय वजन कमी होणे. पोटाच्या या तक्रारींना ‘साध्या’ समजून टाळणे जीवावर बेतू शकते. वेळीच निदान आणि उपचार केल्यास मोठ्या आतड्याच्या कर्करोगाचा धोका टाळता येऊ शकतो.