वॉशिंग्टन : कधी काळी विटेसारखे जड लॅपटॉप वापरावे लागत आणि चित्रपट पाहण्यासाठी किंवा सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यासाठी लॅपटॉपच्या बाजूने ‘सीडी’ टाकण्यासाठी एक ट्रे बाहेर येत असे. त्या काळात ‘सीडी’ ड्राइव्हशिवाय संगणक चालेल अशी कल्पनाही अशक्य होती; पण आजपासून 17 वर्षांपूर्वी जानेवारी महिन्यात स्टेजवर आलेल्या स्टीव्ह जॉब्स यांनी एक साधा लिफाफा उघडला आणि त्यातून बाहेर काढलेल्या अतिशय पातळ मॅकबुक एअरने त्या काळातील तंत्रज्ञान कायमचे बदलून टाकले.
15 जानेवारी 2008 रोजी सॅन फ्रान्सिस्को येथील मॅकवर्ल्ड एक्स्पोमध्ये स्टीव्ह जॉब्स म्हणाले, “आज आम्ही काहीतरी एअर म्हणजेच हवेसारखे हलके सादर करणार आहोत” आणि त्यांनी लिफाफ्यातून काढलेल्या लॅपटॉपने उपस्थित हजारो लोकांना आश्चर्यचकित केले. इतका पातळ लॅपटॉप असून त्यात हार्ड डिस्क आणि प्रोसेसर असेल, यावर विश्वास बसत नव्हता. त्यावेळी डेल, एचपी आणि सोनी सारख्या कंपन्यांचे वर्चस्व होते आणि त्यांच्या लॅपटॉपमध्ये सीडी/ डीव्हीडी राईटर वअनेक पोर्टस् असल्यामुळे ते जाड असत. त्यामुळे मॅकबुक एअर पाहिल्यानंतर लोकांचा पहिला प्रश्न होता, यात सीडी कुठे लावायची?
अॅपलने मॅकबुक एअरमधून ऑप्टिकल डिस्क ड्राईव्ह पूर्णपणे काढून टाकून मोठा जुगार खेळला होता आणि यामुळे हा निर्णय फेल ठरेल, असे अनेक तज्ज्ञांचे मत होते; पण स्टीव्ह जॉब्स यांनी त्यावेळी स्पष्ट सांगितले होते की, भविष्य फिजिकल मीडियाचे नसून वायरलेसचे आहे. चित्रपट आपण डाऊनलोड करू, डेटा वाय-फायद्वारे पाठवला जाईल आणि बॅकअप क्लाऊडवर होईल. त्या काळात जॉब्स यांची ही भविष्यवाणी अवास्तव वाटत होती; परंतु हाच तो लिफाफ्यातून उघड झालेला लॅपटॉप होता, ज्याने जगाला पेन ड्राईव्ह, डिजिटल डाऊनलोड आणि क्लाऊड स्टोरेजची सवय लावली.
आज 17 वर्षांनंतर बाजारात सीडी/ डीव्हीडी ड्राईव्ह असलेले लॅपटॉप जवळजवळ गायब झाले आहेत आणि बहुतेक सर्व नवीन मॉडेल्स ड्राईव्हविना येतात. मॅकबुक एअरच्या लाँचनंतर जगभरात अल्ट्राबुकचा ट्रेंड सुरू झाला आणि सर्व कंपन्यांनी आपले लॅपटॉप पातळ केले, ज्यामुळे सीडी ड्राईव्ह इतिहासातच दडपून गेली. स्टीव्ह जॉब्स यांनी लिफाफ्यातून लॅपटॉप काढणे हा केवळ मार्केटिंग स्टंट नव्हता, तर एक संदेश होता की, आज जी गोष्ट अत्यावश्यक वाटते, ती उद्या तंत्रज्ञानाच्या वेगवान बदलांमुळे बोझ ठरू शकते. मॅकबुक एअरने फक्त लॅपटॉप हलके केले नाहीत, तर संपूर्ण जगाला वायरलेस भविष्यात पोहोचवले.