कृष्णविवरांबाबत स्टीफन हॉकिंग यांचा सिद्धांत ठरला खरा Pudhari File Photo
विश्वसंचार

कृष्णविवरांबाबत स्टीफन हॉकिंग यांचा सिद्धांत ठरला खरा

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : वैज्ञानिकांनी गुरुत्वीय लहरींचा वापर करून दोन कृष्णविवरे एकमेकांमध्ये विलीन होऊन एका महाकाय कृष्णविवराची निर्मिती होताना ‘ऐकले’ आहे. हा शोध लेसर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी (LIGO) ने 14 जानेवारी रोजी लावला. यामुळे 50 वर्षांपूर्वी प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी मांडलेल्या सिद्धांताला, जो त्यांच्या हयातीत कधीही सिद्ध झाला नव्हता, सर्वात मोठा पुरावा मिळाला आहे.

फिजिकल रिव्ह्यू लेटर्स या जर्नलमध्ये बुधवारी (10 सप्टेंबर) प्रकाशित झालेला हा अभ्यास जर्मनीतील पॉट्सडॅम येथील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर ग्रॅव्हिटेशनल फिजिक्सचे डॉक्टरेट विद्यार्थी एड्रियन जी. अबॅक यांच्या नेतृत्वाखालील संशोधनावर आधारित आहे. LIGO गुरुत्वीय लहरींचा शोध घेते. गुरुत्वीय लहरी म्हणजे अंतराळ-काळाच्या (space- time) संरचनेत निर्माण होणार्‍या सूक्ष्म लाटा, ज्या कृष्णविवरे किंवा न्यूट्रॉन तारे (विशाल तार्‍यांचे अवशेष) यांच्यातील टक्कर अशा अत्यंत विध्वंसक घटनांमधून बाहेर पडतात.

जवळपास 10 वर्षांपूर्वी 14 सप्टेंबर 2015 रोजी, LIGO ने अल्बर्ट आईनस्टाईन यांच्या सामान्य सापेक्षतेच्या (general relativity) सिद्धांताला पुष्टी देत पहिल्यांदाच दोन कृष्णविवरांच्या विलीनीकरणातून निर्माण झालेल्या गुरुत्वीय लहरींचा थेट शोध घेतला. कॅलटेक आणि एमआयटी या संस्थांद्वारे संयुक्तपणे चालविल्या जाणार्‍या LIGO मध्ये गेल्या दशकात अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता कृष्णविवरांचे विलीनीकरण दर महिन्याऐवजी दर तीन दिवसांनी शोधले जात आहे, असे एका निवेदनात म्हटले आहे.

14 जानेवारीच्या या घटनेदरम्यान, LIGO ने दोन कृष्णविवरे विलीन होताना पाहिले आणि यातून तयार झालेले कृष्णविवर मूळ दोन कृष्णविवरांपेक्षा लक्षणीयरीत्या मोठे होते. विलीनीकरणापूर्वी दोन कृष्णविवरांचे एकूण पृष्ठफळ सुमारे 2,43,000 चौरस किलोमीटर (93,700 चौरस मैल) होते, जे ओरिगन राज्याच्या आकाराएवढे आहे. याउलट विलीनीकरणानंतर तयार झालेल्या एकाच कृष्णविवराचे पृष्ठफळ सुमारे 4,00,000 चौरस किलोमीटर (1,54,500 चौरस मैल) होते, जे कॅलिफोर्नियाच्या आकाराएवढे आहे. दुसर्‍या शब्दांत सांगायचे झाल्यास, नवीन कृष्णविवर त्याच्या मूळ घटकांच्या एकत्रित पृष्ठफळापेक्षा मोठे होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT