Nature therapy benefits | निसर्गाच्या सान्निध्यात राहा, चिंता मिटेल! 
विश्वसंचार

Nature therapy benefits | निसर्गाच्या सान्निध्यात राहा, चिंता मिटेल!

उंदरांवरील प्रयोगातून स्पष्ट

पुढारी वृत्तसेवा

न्यूयॉर्क : मानसिक शांततेसाठी ‘निसर्गाच्या सानिध्यात जा’ किंवा ‘गवताला स्पर्श करा’ असा सल्ला समाजमाध्यमांवर अनेकदा दिला जातो. आता या सल्ल्याला विज्ञानाचाही आधार असल्याचे एका ताज्या संशोधनातून समोर आले आहे. प्रयोगशाळेतील उंदरांवर केलेल्या अभ्यासानुसार, जे उंदीर बाहेरच्या मोकळ्या वातावरणात राहतात, ते बंदिस्त पिंजर्‍यात राहणार्‍या उंदरांपेक्षा कमी चिंताग्रस्त असतात.

‘करंट बायोलॉजी’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या या संशोधनाने प्रयोगशाळेतील संशोधनाच्या पद्धतीवरच मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे. मानवासाठी औषधांची चाचणी करताना सहसा प्रयोगशाळेतील उंदरांचा वापर केला जातो. मात्र, संशोधकांचे असे मत आहे की, या चाचण्यांमध्ये अनेकदा अपयश येते कारण प्रयोगशाळेतील उंदरांचे आयुष्य अत्यंत कृत्रिम आणि एकाकी असते. कॉर्नेल विद्यापीठातील संशोधक मॅथ्यू झिपल म्हणतात, ‘प्राण्यांवरील चाचण्यांचे निकाल आणि प्रत्यक्ष मानवावरील औषधांच्या चाचण्यांचे निकाल यात मोठी तफावत का असते? याचे महत्त्वाचे कारण म्हणजे प्रयोगशाळेतील अत्यंत कृत्रिम आणि मर्यादित वातावरण असू शकते.‘

अभ्यासात असे दिसून आले की, नैसर्गिक वातावरण जंगलात किंवा बाहेर राहणारे उंदीर सतत कार्यरत असतात. ते अन्न शोधतात, बिळे तयार करतात आणि शिकारी प्राण्यांपासून स्वतःचा बचाव करण्याचे धोके पत्करतात. त्यांचे सामाजिक जीवन समृद्ध असते. प्रयोगशाळेतील वातावरणात याउलट, प्रयोगशाळेतील उंदीर जोडाच्या खोक्याएवढ्या लहान पिंजर्‍यात दोन-तीन सोबत्यांसह राहतात. त्यांना वेळेवर अन्न आणि पाणी मिळते, पण त्यांच्या आयुष्यात कोणतेही आव्हान नसते. मॅथ्यू झिपल यांनी या परिस्थितीची तुलना करताना सांगितले की, अशा उंदरांवर औषधांचे संशोधन करणे म्हणजे जणू ‘एकांतवासात असलेल्या कैद्यांवर’ संशोधन करण्यासारखे आहे. बाहेरील आव्हानात्मक आणि नैसर्गिक वातावरणात राहणारे उंदीर अधिक सक्रिय आणि कमी तणावग्रस्त असल्याचे प्रयोगात आढळले. या संशोधनामुळे भविष्यात औषधांच्या चाचण्यांसाठी प्राण्यांना नैसर्गिक वातावरणात ठेवून अभ्यास करण्याच्या गरजेवर भर दिला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT