विश्वसंचार

प्रकाश प्रदूषणामुळे दिसणार नाहीत तारे!

Shambhuraj Pachindre

लंडन : पाणी, हवा तसेच ध्वनीचे प्रदूषण असते हे आपल्याला माहिती आहे. मात्र, प्रकाशामुळेही प्रदूषण होत असते याची तुम्हाला कल्पना आहे का? सध्या रात्रीच्या वेळी जगभरात विजेच्या दिव्यांचा इतका झगमगाट केला जातो की अनेक ठिकाणी जणू काही रात्रीचा दिवसच होतो. अशा प्रकाशामुळे भविष्यात आकाशातील तारेही दिसणे दुरापास्त होईल असे संशोधकांनी म्हटले आहे. येत्या वीस वर्षांमध्ये लोक आकाशात चमचमणारे तारे पाहू शकणार नाहीत!

ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ मार्टिन रीस यांनी सांगितले की लाईट पोल्युशनमुळे आकाशाचा रंग धुसर होत आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर रात्रीच्या वेळी यामुळे आकाशाचा रंग काळा नव्हे तर हलका करड्या रंगाचा होतो. त्यामुळे मोजेकेच तारे दिसून येतात. कृत्रिम प्रकाश, मोबाईल-लॅपटॉपसारखे गॅझेटस्, शोरूम्सच्या बाहेर लावलेले एलईडी, कारच्या हेडलाईटस् किंवा होर्डिंग्जची आकर्षित करणारी तीव— लाईट यामुळे असे प्रदूषण निर्माण होते. 2016 मध्ये खगोलशास्त्रज्ञांनी म्हटले होते की गेल्या काही वर्षांमध्ये प्रकाशाचे प्रदूषण वाढले आहे. दरवर्षी नाईट स्काय ब्राईटनेस दहा टक्क्यांनी वाढत आहे. या लाईट पोल्युशनमुळे जगातील एक तृतीयांश लोकसंख्येला आकाशगंगा दिसत नाही. आता एका भागात जन्मलेल्या मुलाला समजा 250 तारे दिसत असतील तर आणखी 18 वर्षांनी त्याला तिथे 100 तारेच दिसतील. या प्रकाश प्रदूषणाचा विपरित परिणाम कीटक, पक्षी आणि काही प्राण्यांच्याही जीवनावर होत आहे. मानवी शरीरातील 'जैविक घड्याळा'वरही त्याचा परिणाम होतो आणि मधुमेहाची शक्यता 25 टक्क्यांनी वाढते.

SCROLL FOR NEXT