गुरुवारी, 20 मार्चला वसंत विषुव दिन साजरा झाला. हा एक प्रमुख खगोलीय घटनाक्रम आहे, जेव्हा सूर्य दक्षिण गोलार्धातून उत्तरीय गोलार्धाकडे प्रवास करतो आणि विषुववृत्त ओलांडतो. साधारणपणे 20 - 21 मार्चदरम्यान हा दिवस येतो. यावर्षी तो 20 मार्चला आला, असे ‘नासा’ने जाहीर केले आहे. या दिवसापासूनच उत्तर गोलार्धात वसंत ऋतूचेही आगमन होते. एकंदरीत विषुव दिनाने ‘ऋतुराज आज वनी आला’ हे घोषित केले आहे! या दिवसाबाबतची ही माहिती...
वसंत ऋतूची सुरुवात ः हे उत्तर गोलार्धातील वसंत ऋतूचे पहिले दिवस मानले जाते. मार्च 20-21 दरम्यान हा विशिष्ट दिवस येतो. या दिवशी दिवस आणि रात्र साधारणपणे समान लांबीची असतात.
वसंत विषुवाचे महत्त्व : दिवस मोठे होऊ लागतात आणि उन्हाळ्याची चाहूल लागते. शेती आणि हवामान यावर याचा मोठा प्रभाव असतो. अनेक संस्कृतींमध्ये हा दिवस नववर्ष किंवा नवीन सुरुवातीसाठी महत्त्वाचा मानला जातो.
सूर्य उत्तरेकडे प्रवास करणार ः या दिवसापासून सूर्य उत्तरेकडे झुकायला लागतो, ज्यामुळे उत्तर गोलार्धातील ठिकाणी अधिक प्रकाश आणि उष्णता मिळते. या दिवसानंतर उन्हाळा जाणवू लागतो.
वसंत विषुव म्हणजे काय? : हा दिवस पृथ्वीच्या कक्षेत सूर्याच्या सापेक्ष स्थितीवर ठरतो. या दिवशी पृथ्वीचा अक्ष ( axis) सूर्याच्या दिशेने झुकलेला नसतो. त्यामुळे दिवस व रात्र दोन्ही जवळपास समान लांबीचे असतात.
शरद आणि वसंत विषुव ः वसंत विषुव ( Spring Equinox) हा मार्च 20 किंवा 21 या दिवशी होतो. शरद विषुव ( Autumnal Equinox) हा सप्टेंबर 22/23 या दिवशी होतो. या दोन्ही दिवशी, सूर्य विषुववृत्ताच्या थेट वर असतो आणि पृथ्वीवर दिवस-रात्र समान असते.
वसंत विषुव आणि जगभरातील परंपरा ः या दिवसाचा अनेक संस्कृतींमध्ये नवसंजीवनी व नववर्ष म्हणून उत्सव साजरा केला जातो. फारसी नववर्ष (नवरोज), जपानी शुंबुन-नो-ही, मेक्सिकोतील माया संस्कृतीचे सूर्यपूजन याच दिवशी असते.