विश्वसंचार

Fossil Treasure Spitsbergen | ‘ग्रेट डाईंग’नंतर सागरी जीवन वेगाने सावरले होते; जीवाश्माआधारे नवे संशोधन

नॉर्वेच्या स्पिटस्बर्गन बेटावर 30,000 जीवाश्मांचा खजिना

पुढारी वृत्तसेवा

स्टॉकहोम : पृथ्वीच्या इतिहासातील सर्वात मोठा विनाशकारी एंड-पर्मियन मास एक्स्टिन्कशन म्हणजेच ग्रेट डाईंगनंतर सागरी परिसंस्था (मरीन इकोसिस्टीम) किती जलद गतीने सावरली, याबद्दलच्या जुन्या समजुतींना आर्क्टिकमधील एका मोठ्या शोधाने आव्हान दिले आहे. पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार, सागरी जीवन सावरण्यासाठी 80 लाख वर्षे लागली, असा पूर्वीचा अंदाज आता खोटा ठरला आहे.

स्पिटस्बर्गन येथे दुर्मीळ शोध

नॉर्वेच्या स्वालबार्ड द्वीपसमूहातील स्पिटस्बर्गन बेटावर सुमारे 24.9 कोटी वर्षांपूर्वीचे जीवाश्म सापडले. यामध्ये तब्बल 30,000 हून अधिक जीवाश्मांचा (दांत, हाडे, इत्यादी) समावेश आहे. तसेच यामध्ये डायनासोर युगातील सर्वात जुनी ज्ञात सागरी सरपटणार्‍या प्राण्यांची परिसंस्था उघड झाली. ‘सायन्स जर्नल’मध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासानुसार, सागरी जीवन महाविनाशानंतर अवघ्या तीन दशलक्ष वर्षांत (30 लाख वर्षे) पुन्हा जटिल अन्नसाखळ्यांसह (कॉम्पेक्स फूड चेन) तयार झाले.

समुद्री जीवनातील वैविध्य

या जीवाश्म साठ्यामध्ये इक्थिओसॉर्स, सागरी उभयचर प्राणी, हाडे असलेले मासे आणि शार्क यांचा समावेश आहे. सापडलेल्या प्रमुख प्राण्यांमध्ये खालील प्राण्यांचा समावेश आहे. ग्रिप्पिया लॉन्गिरोस्ट्रिस हा लहान इक्थियोप्टेरिजियन प्राणी स्क्विडसारख्या अ‍ॅमोनॉईडस्ची शिकार करत असे. अ‍ॅफेनरम्मा हा सागरी उभयचर प्राणी माशांची शिकार करायचा. सायम्बॉस्पॉन्डायलस हा 5 मीटरपेक्षा जास्त लांबीचा महाकाय इक्थिओसॉर खोल समुद्रातील सर्वोच्च शिकारी होता.

मोठा वैज्ञानिक निष्कर्ष

संशोधकांनी सांगितले की, या जीवाश्मांच्या वैविध्यामुळे हे सिद्ध होते की, सागरी परिसंस्थांची पुनर्बांधणी खूप जलद गतीने झाली. हा शोध जीवनाच्या लवचिकतेवर प्रकाश टाकतो आणि समुद्रात राहणार्‍या सरपटणार्‍या प्राण्यांचे विविधीकरण महाविनाशापूर्वीच सुरू झाले असावे, यावरही प्रकाश टाकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT