लंडन : पुरुषांमधील शुक्राणूंची (स्पर्म) गुणवत्ता ही ऋतूंनुसार बदलत असते, असा निष्कर्ष एका नवीन संशोधनातून समोर आला आहे. या संशोधनानुसार, शुक्राणूंची गुणवत्ता उन्हाळ्यात उच्च पातळीवर असते, तर हिवाळ्यात ती खालावलेली दिसून येते.
‘रिप्रोडक्टिव्ह बायोलॉजी अँड एंडोक्राईनोलॉजी’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या या संशोधनासाठी डेन्मार्क आणि अमेरिकेतील (फ्लोरिडा) 15,000 हून अधिक दात्यांच्या वीर्य नमुन्यांचे विश्लेषण करण्यात आले. शास्त्रज्ञांना दोन्ही देशांमधील नमुन्यांमध्ये एकसमान आकृतिबंध (पॅटर्न) आढळला. जून आणि जुलै महिन्यांत ‘प्रोग्रेसिव्हली मोटाईल’ (सरळ रेषेत वेगाने पोहणारे) शुक्राणूंचे प्रमाण सर्वाधिक होते. याउलट, डिसेंबर आणि जानेवारीमध्ये हे प्रमाण सर्वात कमी असल्याचे दिसून आले.
मँचेस्टर विद्यापीठातील ‘अँड्रोलॉजी’चे प्राध्यापक आणि या अभ्यासाचे सहलेखक अॅलन पेसी यांनी सांगितले की, ‘उन्हाळ्यात शुक्राणूंची गुणवत्ता चांगली असल्याने या काळात दात्यांचे अर्ज स्वीकारले जाण्याची शक्यता जास्त असते. यावरून असाही तर्क लावता येईल की, अपत्यप्राप्तीसाठी प्रयत्न करणार्या जोडप्यांना उन्हाळ्यात अधिक यश मिळू शकते. मात्र, हा केवळ एक सिद्धांत आहे.’ दुसरीकडे, सेंट लुईस येथील ‘द सिल्बर इनफर्टिलिटी सेंटर’चे संचालक आणि मूत्रपिंड तज्ज्ञ डॉ. शर्मन सिल्बर यांनी या निष्कर्षावर काहीसे असहमती दर्शवली आहे. त्यांच्या मते, ऋतूंनुसार शुक्रजंतूंच्या हालचालीत होणारा हा बदल अत्यंत नगण्य आहे.
प्रत्यक्ष जीवनातील प्रजनन क्षमतेवर याचा कोणताही मोठा परिणाम होणार नाही, कारण हा फरक जैविकद़ृष्ट्या अत्यंत अल्प आहे. विशेष म्हणजे, मानवी शरीरात शुक्रजंतू तयार होण्यासाठी साधारणपणे 74 दिवस लागतात. संशोधकांनी तापमानाचा या प्रक्रियेवर परिणाम होतो का, हे देखील तपासले. परंतु, वीर्यदानावेळचे तापमान किंवा त्याआधीच्या दोन महिन्यांतील तापमान यांचा शुक्रजंतूंच्या गुणवत्तेशी कोणताही ठोस संबंध आढळला नाही. त्यामुळे हा बदल केवळ हवामानामुळे आहे की मानवी उत्क्रांतीचा भाग, यावर अजूनही संशोधन सुरू आहे.