लंडन : जगभरातील कोळ्यांच्या वेगाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनी एक अत्यंत रंजक आणि थक्क करणारी माहिती समोर आणली आहे. जगभरातील कोळ्यांच्या २५८ प्रजातींचा अभ्यास केल्यानंतर शास्त्रज्ञांना आढळले की, काही कोळी अकल्पनीय वेगाने धावू शकतात. यामध्ये ऑस्ट्रेलियात आढळणारा ‘हंटस्मॅन कोळी’ (Australian Huntsman Spider) हा जगातील सर्वात वेगवान कोळी ठरला आहे. हा कोळी चक्क ३.५९ मीटर प्रति सेकंद (म्हणजेच सुमारे १३ किलोमीटर प्रति तास) या वेगाने धावू शकतो.
हा वेग सर्वसामान्य माणसाच्या जलद चालण्याच्या वेगापेक्षाही अधिक आहे. वेगाच्या बाबतीत हा कोळी माणसालाही मात देऊ शकतो. शास्त्रज्ञांनी नवीन संशोधनादरम्यान प्रयोगशाळेतील मोजमापे आणि जुन्या नोंदी एकत्रित करून २५८ प्रजातींच्या कोळ्यांच्या धावण्याच्या क्षमतेचा आतापर्यंतचा सर्वात मोठा डेटासेट (माहिती संग्रह) तयार केला आहे. या अभ्यासानुसार, कोळ्यांचा वेग हा त्यांच्या शरीराचा आकार, पायांची लांबी आणि शिकार करण्याच्या पद्धतीवर अवलंबून असतो. हा वेगवान प्रवास त्यांना शिकार पकडण्यास, शत्रूंपासून स्वतःचा बचाव करण्यास आणि कठीण परिस्थितीत जिवंत राहण्यास मदत करतो. कोळ्याच्या शरीराचे वजन जसे वाढते, तसा त्याचा धावण्याचा वेगही वाढतो. या संशोधनात सर्वात संथ वेग ‘मनी स्पायडर’चा आढळला. हा कोळी अवघ्या १.५ मिलिमीटर आकाराचा असून, त्याचा वेग केवळ ०.०१८ मीटर प्रति सेकंद इतका नोंदवला गेला. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियातील जंगलात आढळणारा हंटस्मॅन कोळी ३.५९ मीटर प्रति सेकंद (ताशी सुमारे ८ मैल किंवा १३ कि.मी.) या विक्रमी वेगाने धावून जगातील सर्वात वेगवान कोळी ठरला आहे. ‘ऑस्ट्रेलियन म्युझियम'च्या अहवालानुसार, हंटस्मॅन कोळ्यांचे शरीर मोठे आणि पाय खूप लांब असतात. यांचा रंग मुख्यत्वे राखाडी ते तपकिरी असतो आणि काही वेळा त्यांच्या पायांवर पट्टेही असतात. यातील बहुतांश कोळ्यांचे शरीर चपट्या आकाराचे असते, ज्यामुळे त्यांना झाडांच्या सालीखाली किंवा खडकांच्या अरुंद फटींमध्ये राहणे सोपे जाते.
हे कोळी साधारणपणे झाडांची सैल पडलेली साल, खडकांच्या भिंती, लाकडाच्या ओंडक्यांमधील भेगा आणि जमिनीवर पडलेल्या झाडांच्या पालापाचोळ्यात राहतात. इंपीरियल कॉलेज लंडनचे संशोधक डेव्हिड लॅबॉन्टे आणि एडिथ कोवान विद्यापीठाच्या लिंडा मेसन यांच्या मते, भक्ष्य पकडण्याची आणि स्वतःचा जीव वाचवण्याची निसर्गाची गरज यातूनच हंटस्मॅन कोळ्यांमध्ये हा असाधारण वेग विकसित झाला आहे. हंटस्मॅन कोळ्यांचे लांब पाय त्यांच्यासाठी ‘स्पीड गिअर'सारखे काम करतात. संशोधकांनी स्पष्ट केले की, कोळ्यांचा वेग केवळ त्यांच्या आकारावर किंवा जाळे विणण्याच्या सवयींवर अवलंबून नसून, त्यांच्या पायांच्या विशिष्ट रचनेवर अधिक अवलंबून असतो.