विश्वसंचार

मंगळाच्या भ्रमणाचा वाढला वेग

Arun Patil

न्यूयॉर्क : सूर्यमालेतील सर्व ग्रह सूर्याभोवती स्वत:च्या निर्धारित कक्षेतून परिक्रमण करतात. पृथ्वीही सूर्याभोवती फिरते व त्याचबरोबर स्वतःभोवतीही फिरत असते. त्यामुळे दिवस आणि रात्रीचे गणित मांडता येते. पृथ्वीचा शेजारी असलेल्या मंगळाबाबतही असेच घडते. सध्या मंगळावर दिवस लहान होत असल्याची बाब समोर आली आहे. वैज्ञानिकांच्या माहितीनुसार मंगळाचे हे फिरणे 4 मिलीएआरसीसेकंडने वाढले आहे.

अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था 'नासा'च्या इनसाईट मार्स लँडर मोहिमेतून समोर आलेल्या माहितीनुसार ते मंगळाचा अचूक वेग टिपण्यात यशस्वी झाले आहेत. मंगळाची वाढलेली गती एका मंगळ वर्षामध्ये एक मिलिसेकंद अंशाच्या बरोबरीची आहे. 'नासा'च्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीनुसार ही आकडेवारी इनसाईट मार्स लँडरवर लावण्यात आलेल्या रेडियो ट्रान्सपाँडर आणि अँटीनामुळे मिळू शकली आहे. वैज्ञानिक भाषेला या कृतीला 'रोटेशन अँड इंटिरियर स्ट्रक्चर एक्सपेरिमेंट' असे म्हटले जाते.

अद्यापही मंगळाचा वेग नेमका का वाढला आहे ही बाब मात्र लक्षात येऊ शकलेली नाही. पण इथून पुढे या घटनेवर लक्ष ठेवण्यात येणार असून, येत्या काळात त्यामागची कारणे लगेचच लक्षात येतील असे संशोधकांचे मत आहे. फक्त मंगळच नव्हे, तर पृथ्वीच्या फिरण्याचा वेगही वाढल्याची माहिती संशोधकांनी दिली होती. उपलब्ध आकडेवारीनुसार मागील वर्षी 29 जुलै रोजी पृथ्वीने स्वत:भोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 24 तासांहून कमी वेळ घेतला होता.

SCROLL FOR NEXT