Muscle strength bacteria | एका विशिष्ट जीवाणूमुळे वाढते स्नायूंची शक्ती 
विश्वसंचार

Muscle strength bacteria | एका विशिष्ट जीवाणूमुळे वाढते स्नायूंची शक्ती

मेडिटेरियन आहारामुळे वाढतो हा जीवाणू

पुढारी वृत्तसेवा

लेडेन (नेदरलँड) : तुमच्या शरीरातील स्नायूंची ताकद केवळ व्यायामावरच नाही, तर तुमच्या पोटातील एका विशिष्ट सूक्ष्मजीवावर (जीवाणू) अवलंबून असू शकते. नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असे दिसून आले आहे की, ज्यांच्या शरीरातील स्नायू अधिक बळकट आहेत, त्यांच्या आतड्यांमध्ये एका विशिष्ट प्रकारचा बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणात आढळतो. विशेष म्हणजे, हा बॅक्टेरिया उंदरांना दिल्यावर त्यांच्या शक्तीमध्येही वाढ झाल्याचे शास्त्रज्ञांना दिसून आले आहे. हा जीवाणू सर्वसाधारणपणे मेडिटेरियन आहार घेणार्‍या लोकांच्या पोटात असतो, असेही आढळले.

नेदरलँडमधील लेडेन युनिव्हर्सिटीचे क्रीडा शास्त्रज्ञ आणि या अभ्यासाचे मुख्य लेखक बोर्जा मार्टिनेझ-टेलेझ यांच्या मते, या सूक्ष्मजीवाचा वापर भविष्यात ‘प्रोबायोटिक सप्लिमेंट’ म्हणून केला जाऊ शकतो. वृद्ध लोकांमध्ये जाणवणारा अशक्तपणा किंवा स्नायूंचा कमकुवतपणा दूर करण्यासाठी हे एक प्रभावी औषध ठरू शकते. मात्र, यासाठी या बॅक्टेरियाला गोळीच्या स्वरूपात सुरक्षित ठेवण्याचे आव्हान संशोधकांसमोर आहे. ‘गट’ या नियतकालिकात 10 मार्च रोजी प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासात शास्त्रज्ञांनी स्नायूंच्या ताकदीचा संबंध पोटातील बॅक्टेरियाशी जोडला आहे.

यासाठी 18 ते 25 वयोगटातील 90 तरुण आणि 65 ते 71 वयोगटातील 33 वृद्धांच्या विष्ठेचे नमुने घेण्यात आले. सर्व सहभागींची ‘हँडग्रिप’ (हाताची पकड) तपासण्यासाठी त्यांना एक उपकरण दाबण्यास सांगितले गेले. ज्यांची पकड अधिक मजबूत होती, त्यांच्या आतड्यांमध्ये ‘रोझबुरिया इनुलिनिव्होरन्स’ (Roseburia inulinivorans) नावाच्या बॅक्टेरियाची संख्या सर्वाधिक असल्याचे आढळले. हा विशिष्ट बॅक्टेरिया प्रामुख्याने फायबर (तंतुमय पदार्थ) पचवण्यास मदत करतो. संशोधकांनी असे निरीक्षण नोंदवले की हा बॅक्टेरिया सामान्यत ः अशा लोकांच्या पोटात आढळतो जे ‘मेडिटेरियन डाएट’ घेतात.

या आहारात फळे, भाज्या, ओमेगा-3 युक्त मासे आणि एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईलचा समावेश असतो. ‘आतड्यांतील सूक्ष्मजीव आणि स्नायूंचा अशक्तपणा यांचा जवळचा संबंध असल्याचे पुरावे आता समोर येत आहेत. हा विशिष्ट बॅक्टेरिया नेमका कसा कार्य करतो, हे समजल्यास भविष्यात मानवी क्लिनिकल ट्रायल्सद्वारे स्नायूंची ताकद वाढवणारी नवीन उपचारपद्धती विकसित करता येईल, असे संशोधक मॅट कुक यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT