ब्रिस्बेन : जगभरात चिंतेचा विषय ठरलेल्या चिकुनगुनिया या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी शास्त्रज्ञ आता यशाच्या अगदी जवळ पोहोचले आहेत. ऑस्ट्रेलियातील ग्रिफिथ युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी चिकुनगुनियापासून बचाव करणारी एक विशेष लस विकसित केली आहे. हा आजार केवळ तीव्र तापच आणत नाही, तर सांध्यांमध्ये असह्य वेदना निर्माण करतो, ज्या अनेक वर्षे टिकू शकतात.
प्रोफेसर बर्न्ड रेहम आणि त्यांच्या टीमने ही लस बनवण्यासाठी एक अत्यंत वेगळी आणि आधुनिक पद्धत अवलंबली आहे. शास्त्रज्ञांनी या बॅक्टेरियाचा वापर एखाद्या ‘छोट्या फॅक्टरी’सारखा केला आहे. या बॅक्टेरियाच्या मदतीने अतिसूक्ष्म बायोपॉलिमर कण तयार करण्यात आले असून, त्यावर चिकुनगुनिया व्हायरसचे ‘अँटीजन’ लावले आहेत. हे कण दिसायला हुबेहूब व्हायरससारखे असतात; पण ते आजार पसरवत नाहीत. जेव्हा हे कण शरीरात जातात, तेव्हा आपली रोगप्रतिकारक शक्ती त्यांना खरा व्हायरस समजून त्यांच्याशी लढण्याची तयारी करते. यामुळे भविष्यात खर्या व्हायरसचा हल्ला झाल्यास शरीर त्याला तोंड देण्यासाठी आधीच सज्ज असते. हा विषाणू प्रामुख्याने बाधित डासांच्या चाव्यामुळे शरीरात पसरतो.
याचे गंभीर परिणाम खालीलप्रमाणे दिसून येतात :
1. तीव्र लक्षणे : ताप, थंडी वाजणे, अशक्तपणा, डोकेदुखी आणि त्वचेवर पुरळ उठणे.
2. सांधेदुखी : हा विषाणू सांधे, स्नायू आणि कनेक्टिव्ह टिश्यूवर हल्ला करतो.
3. दीर्घकालीन त्रास : सर्वात मोठी चिंता म्हणजे सुमारे 60 टक्के रुग्णांना हा आजार बरा झाल्यानंतरही महिने किंवा कित्येक वर्षे सांधेदुखीचा त्रास सहन करावा लागतो. ही वेदना अनेकदा ‘रुमेटॉईड आर्थराईटिस’सारखी गंभीर असते. संशोधनाचे सुरुवातीचे निष्कर्ष अत्यंत सकारात्मक आहेत. आता शास्त्रज्ञ या लसीच्या क्लिनिकल ट्रायलच्या (मानवी चाचणी) पुढच्या टप्प्याची तयारी करत आहेत. यामध्ये प्रथम लसीच्या सुरक्षिततेची आणि नंतर ती संसर्ग रोखण्यासाठी किती प्रभावी आहे, याची तपासणी केली जाईल. ही लस यशस्वी झाल्यास जगभरातील लाखो लोकांना चिकनगुनियाच्या वेदनादायक त्रासातून कायमची सुटका मिळू शकेल.