Roman Empire Latin Inscription | स्पेनमधील गुहेत रोमन साम्राज्यातील सर्वाधिक लॅटिन शिलालेख  
विश्वसंचार

Roman Empire Latin Inscription | स्पेनमधील गुहेत रोमन साम्राज्यातील सर्वाधिक लॅटिन शिलालेख

‘लेडी’ देवीचा गूढ उल्लेख!

पुढारी वृत्तसेवा

माद्रिद : पूर्व स्पेनमधील एका गुहेतील भूमिगत प्रार्थनास्थळात पुरातत्त्व शास्त्रज्ञांना १२० हून अधिक लॅटिन शिलालेख आढळून आले आहेत. संपूर्ण रोमन साम्राज्यात एकाच ठिकाणी सापडलेली ही लॅटिन शिलालेखांची सर्वात मोठी संख्या आहे. या शिलालेखांमुळे प्राचीन रोमन महिलांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनावर नवा प्रकाश पडला असून, यातील पाच शिलालेखांमध्ये ‘द लेडी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका अज्ञात देवीचा उल्लेख आढळला आहे.

स्पेनच्या पूर्व किनारपट्टीवरील व्हॅलेंसियाजवळ असलेल्या ‘कोव्हा दे लेस दोनेस’ (महिलांची गुहा) येथे यावर्षीच झालेल्या उत्खननादरम्यान संशोधकांनी हे शिलालेख शोधून काढले. २०२४ मध्ये येथे सुरुवातीला फक्त १५ शिलालेख सापडले होते; परंतु आता या नव्या शोधामुळे शिलालेखांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हे शिलालेख प्रामुख्याने इसवी सनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या शतकातील असून, गुहेच्या खोल भागातील भिंतींवर आणि छतावर कोरलेले आढळले आहेत. संशोधकांनी या भागाला ‘रोमन सँक्चुअरी’ असे नाव दिले आहे.

स्पेनमधील सेव्हिल नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ डिस्टन्स एज्युकेशनचे पुरातत्त्व शास्त्रज्ञ आणि गुहा संशोधक सर्जिओ गार्सिया-डिल्स यांनी सांगितले, ‘हे सर्व लेख गुहेच्या प्रवेशद्वारापासून दूर, एका विशिष्ट आणि मर्यादित भागात एकवटलेले आहेत. यावरून येथे एका संघटित पंथाची पूजा चालत असल्याचे स्पष्ट होते.’ संशोधकांच्या मते, या गुहेत ‘डोमिना’ म्हणजेच ‘द लेडी’ नावाच्या एका गूढ देवीला समर्पित पंथाचे लोक एकत्र येत असावेत आणि तिची नियमित पूजा करत असावेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT