टेक्सास : एलन मस्क यांची कंपनी ‘स्पेसएक्स’ मंगळवारी (19 मे) जगातील सर्वात उंच आणि शक्तिशाली रॉकेट ‘स्टारशिप V3’ लाँच करण्यासाठी सज्ज झाली आहे. 2028 मध्ये ‘नासा’च्या मोहिमेद्वारे मानवाला पुन्हा चंद्रावर उतरवण्याचे स्पेसएक्सचे ध्येय असून, त्या द़ृष्टीने ही 12 वी चाचणी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
दक्षिण टेक्सासमधील ‘स्टारबेस’ येथून भारतीय वेळेनुसार रात्री उशिरा (अमेरिकेतील वेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता) हे प्रक्षेपण होईल. हे रॉकेट 407 फूट (124 मीटर) उंच आहे, जे फुटबॉल मैदानाच्या लांबीपेक्षाही जास्त आहे. यात आधुनिक ‘रॅप्टर 3’ इंजिनांचा वापर करण्यात आला आहे. हे रॉकेट ‘स्टारशिप स्पेसक्राफ्ट’ आणि ‘सुपर हेवी रॉकेट’ अशा दोन भागांनी बनलेले आहे. स्पेसएक्ससाठी स्टारशिपचा प्रवास चढ-उतारांचा राहिला आहे. गेल्या वर्षी सातव्या आणि आठव्या चाचणीदरम्यान रॉकेटचे तुकडे आकाशातून कोसळले होते, तर नववी चाचणी अपयशी ठरली होती. मात्र, ऑगस्ट 2025 मधील 10 वी चाचणी आणि ऑक्टोबरमधील 11 वी चाचणी यशस्वी झाल्यामुळे कंपनीचा आत्मविश्वास वाढला आहे. या मोहिमेच्या यशावर 2028 च्या चंद्रमोहिमेचे भवितव्य अवलंबून असल्याने संपूर्ण जगाचे लक्ष या प्रक्षेपणाकडे लागले आहे.
प्रवास : हा प्रवास साधारण एक तास चालेल. स्टारशिप अंतराळात गेल्यावर ‘सुपर हेवी बूस्टर’पासून वेगळे होईल.
लँडिंग : यावेळी रॉकेट जमिनीवर उतरवण्याऐवजी मेक्सिकोच्या आखातात समुद्रात उतरवले जाईल. नवीन डिझाईनचे वाहन असल्याने यावेळी ‘कॅच’ करण्याचा प्रयत्न केला जाणार नाही.
सॅटेलाईट तैनात : प्रवासादरम्यान हे यान 22 ‘स्टारलिंक सिम्युलेटर’ उपग्रह तैनात करेल.
हीट शील्ड चाचणी : यानातील दोन उपग्रह मुद्दाम कमकुवत केलेल्या ‘हीट शील्ड’चे स्कॅनिंग करतील, जेणेकरून भविष्यातील आव्हानांचा अभ्यास करता येईल.