बीजिंग : चीनच्या दोन अंतराळवीरांनी रविवारी चीनच्या नव्या आणि निर्माणाधीन अंतराळ स्थानकाच्या बाहेर पडून यशस्वी 'स्पेस वॉक' केले. यादरम्यान 15 फूट लांबीचे रोबोटिक आर्मचे काम पूर्ण करण्यात आले. चिनी अंतराळ यात्री लियू बोमिंग आणि टँग होगंबो यांना अंतराळ स्थानकातून बाहेर पडून स्पेस वॉक करताना त्यांना चिनी सरकारी टीव्हीने दाखविले. हे अंतराळ यात्री अंतराळ स्थानकातून बाहेर येताच ते पृथ्वीच्या खाली फिरत असल्यासारखे दिसत होते.
चिनी अंतराळ स्थानकातील तिसरा यात्री आणि कमांडर नी हॅशेंग हे स्थानकाच्या अंतर्गत भागात राहून स्पेस वॉक करणार्या दोघांना मार्गदर्शन करत होते. हे तिघे अंतराळ प्रवासी गेल्या 17 जून रोजी आपल्या नवनिर्माणाधीन असलेल्या अंतराळ स्थानकावर दाखल झाले होते.
चीनची ही अंतराळातील अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. सध्या अंतराळात नव्या अंतराळ स्थानकाची निर्मिती करण्यात येत आहे. तसेच चीनने गेल्या मे महिन्यात मंगळावर एक रोबोट रोव्हरचे यशस्वी लँडिंग केले होते. ही खास अंतराळ मोहीम चीनमधील सत्तारूढ कम्युनिस्ट पार्टीच्या स्थापनेच्या 100 व्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित करण्यात आली आहे.
अंतराळ स्थानकाचे पहिले मॉड्यूल, तियानहे अथवा हेवनली हार्मनी गेल्या 29 एप्रिल रोजी लाँच करण्यात आले. त्यानंतर आज, रविवारी लियू आणि टँग यांनी अंतराळ स्थानकाबाहेर पडून रोबोटिक आर्म बसविले.