वॉशिंग्टन : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) असलेल्या एका अंतराळवीराला अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय समस्येमुळे नासाने गुरुवारी (8 जानेवारी) नियोजित केलेला ‘स्पेस वॉक’ स्थगित केला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, नासा आता आपल्या क्रू-11 मोहिमेतील अंतराळवीरांना निर्धारित वेळेआधीच पृथ्वीवर परत आणण्याचा विचार करत असल्याची माहिती संस्थेने दिली आहे.
बुधवारी (7 जानेवारी) अंतराळ स्थानकावरील एका अंतराळवीराची प्रकृती बिघडल्याचे समोर आले. गुरुवारी सकाळी अमेरिकन अंतराळवीर माईक फिन्के आणि झिना कार्डमन हे 6.5 तासांच्या स्पेस वॉकसाठी बाहेर पडणार होते. आयएसएसवर नवीन सोलर पॅनल्स बसवण्यासाठी आवश्यक तयारी करणे हा या मोहिमेचा उद्देश होता. मात्र, वैद्यकीय आणीबाणीमुळे हा निर्णय बदलावा लागला. नासाने संबंधित अंतराळवीराचे नाव किंवा आजाराचे स्वरूप अद्याप उघड केलेले नाही. परंतु त्या व्यक्तीची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे स्पष्ट केले आहे.
नासाच्या प्रवक्त्याने सांगितले की, नासा आणि आमचे भागीदार अशा कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी नेहमी प्रशिक्षित असतात. मिशनची सुरक्षितता आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. आम्ही ‘क्रू-11’ मोहीम लवकर संपवण्याच्या शक्यतेसह सर्व पर्यायांचा विचार करत आहोत. ‘क्रू-11’ हे पथक 2 ऑगस्ट 2025 रोजी सहा महिन्यांच्या मोहिमेसाठी अंतराळ स्थानकावर पोहोचले होते. यामध्ये माईक फिन्के आणि झिना कार्डमन यांच्यासह जपानचे किमिया युई आणि रशियाचे ओलेग प्लाटोनोव्ह यांचा समावेश आहे. हे पथक फेब्रुवारीच्या मध्यात ‘क्रू-12’च्या आगमनानंतर परतणार होते.
जर ‘क्रू-11’ला लवकर परत बोलावले, तर अंतराळ स्थानकाच्या नियमित कामकाजावर काय परिणाम होईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या आयएसएसवर नासाचे ख्रिस्तोफर विल्यम्स आणि रशियाचे सर्गेई कुड-स्वेर्च्कोव्ह व सर्गेई मिकाएव हे अंतराळवीर देखील उपस्थित आहेत. हे तिघे रशियन सोयुझ यानद्वारे तिथे पोहोचले होते. नियमित अंतराळवीर बदलाच्या प्रक्रियेत अशा प्रकारे अचानक बदल होणे ही एक दुर्मीळ घटना मानली जात आहे. नासा सध्या वैद्यकीय परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून पुढील काही दिवसांत परतीच्या प्रवासाबाबतचा अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे.