टोकियो : जपान एका अभिनव आणि भव्य अंतराळ मोहिमेच्या तयारीत आहे. जपान आगामी काळात मंगळाचा उपग्रह असलेल्या ‘फोबोस’ या चंद्रावरून मातीचे नमुने पृथ्वीवर आणण्यासाठी ऐतिहासिक ‘मार्शियन मून्स एक्सप्लोरेशन’ (MMX) मिशन लॉन्च करणार आहे. जपान एरोस्पेस एक्स्प्लोरेशन एजन्सी (JAXA) चे H3 रॉकेट २० ऑक्टोबर रोजी तनेगाशिमा स्पेस सेंटरवरून झेप घेईल, अशी माहिती समोर आली आहे.
मानवी इतिहासातील ही मार्स सिस्टीमची पहिलीच ‘राऊंड-ट्रिप’ (जाऊन येण्याची) मोहीम ठरणार आहे. हे अंतराळयान (प्रोब) १ वर्षानंतर मंगळावर पोहोचून पुढील ३ वर्षे फोबोसची परिक्रमा करेल आणि तिथून किमान १० ग्रॅम माती घेऊन २०३१ मध्ये पृथ्वीवर परत येईल. सौरमालेची उत्पत्ती आणि जीवनाचे रहस्य उलघडणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. MMX नावाचे हे मानवरहित मिशन अमेरिका आणि युरोपच्या अंतराळ संस्था तसेच अनेक विद्यापीठे आणि तंत्रज्ञान कंपन्यांचा संयुक्त प्रयत्न आहे. या मोहिमेमुळे भविष्यात मानवाला मंगळाचा शोध घेण्यासाठी मोठा पाया रचण्यास मदत मिळणार आहे. JAXA ने दिलेल्या माहितीनुसार, MMX ला घेऊन जाणारे मुख्य H3 रॉकेट मंगळवारी सकाळी ४.४१ वाजता (भारतीय वेळेनुसार पहाटे ०१.११ वाजता) तनेगाशिमा स्पेस सेंटरवरून उड्डाण करेल.
सुरक्षित लँडिंग सुनिश्चित करण्यासाठी ‘आयडेफिक्स’ (Idefix) नावाचा एक रोवर (कॉमिक हिरो एस्टेरिक्सच्या कुत्र्याचे फ्रेंच नाव) सर्वात आधी फोबोसच्या पृष्ठभागाची पाहणी करेल. फोबोसवरून नमुने गोळा करण्याची ही जगातील पहिलीच वेळ असणार आहे. JAXA नुसार, हे मिशन फोबोसचा वापर एक ‘नैसर्गिक अंतराळ स्थानक’ म्हणून करण्याची शक्यता तपासून पाहणार आहे. यासाठी मंगळावरील राऊंड-ट्रिपच्या गरजा समजून घेतल्या जातील, जे भविष्यात ‘‘मानवासह मंगळाचा शोध घेण्यासाठी’’ अत्यंत आवश्यक आहे.
पृथ्वीवर परतण्यापूर्वी हे यान मंगळाचा दुसरा चंद्र असलेल्या ‘डीमोस’ची देखील पाहणी करेल, जरी त्यावर प्रत्यक्ष उतरले जाणार नाही. मंगळ आणि त्याचे दोन्ही चंद्र कसे निर्माण झाले, हे या मोहिमेतून स्पष्ट होईल, अशी जपानच्या अंतराळ संस्था (JAXA) ला आशा आहे. ही माहिती सौरमालेची उत्पत्ती समजून घेण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची दुवा ठरू शकते. मंगळाच्या चंद्रांच्या उत्पत्तीबद्दल एक सिद्धांत ‘जायंट इम्पैक्ट’ (विशाल संघटन) परिकल्पना आहे. यानुसार, जेव्हा एखादा खगोलीय पिंड मंगळावर आदळला, तेव्हा या चंद्रांची निर्मिती झाली.