केप कॅनव्हरल : पृथ्वीवर करोडो लोकांना त्रस्त करणार्या डायबेटिस अर्थात, मधुमेहावरील उपचारात क्रांती घडवण्यासाठी आता अंतराळाची मदत घेतली जात आहे. अॅक्सिअम-4 मोहिमेतील अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अत्यल्प गुरुत्वाकर्षणाच्या स्थितीत इन्सुलिनवर अभ्यास करणार आहेत. या संशोधनामुळे मधुमेहींसाठी अधिक प्रभावी आणि स्थिर इन्सुलिन तयार करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
पृथ्वीवर इन्सुलिनचे रेणू एकत्र येऊन गुठळ्या तयार होतात, ज्यामुळे त्याची परिणामकारकता कमी होते. इन्सुलिन पंपांसारख्या उपकरणांमध्ये यामुळे अडथळे निर्माण होतात. मात्र, अंतराळातील मायक्रोग्रॅव्हिटीच्या वातावरणात ही प्रक्रिया अत्यंत मंदावते. यामुळे शास्त्रज्ञांना इन्सुलिनच्या रेणूंची गुठळी तयार होण्याच्या प्रक्रियेचे अधिक सखोल विश्लेषण करण्याची संधी मिळणार आहे.
अॅक्सिअम-4 मोहिमेतील अंतराळवीर या प्रक्रियेचा अभ्यास करून असा डेटा गोळा करतील, ज्याच्या मदतीने पृथ्वीवर अधिक स्थिर आणि जास्त काळ टिकणारे इन्सुलिन विकसित करता येईल. हे संशोधन यशस्वी झाल्यास, ते केवळ इन्सुलिनची परिणामकारकता वाढवणार नाही, तर मधुमेहावरील उपचारांचा खर्च कमी करण्यासही मदत करेल.