बीजिंग : चीनच्या अंतराळ स्थानकावर पाठवण्यात आलेल्या एका विशेष मोहिमेतील चार उंदरांपैकी एका मादी उंदराने पृथ्वीवर सुखरूपपणे पिल्लांना जन्म दिला आहे. अंतराळ प्रवासाचा सस्तन प्राण्यांच्या पुनरुत्पादन क्षमतेवर काय परिणाम होतो, हे अभ्यासण्याच्या द़ृष्टीने हे एक मोठे यश मानले जात आहे.
‘शिन्हुआ’ या वृत्तसंस्थेनुसार, 31 ऑक्टोबर रोजी दोन नर आणि दोन मादी अशा एकूण चार उंदरांना अंतराळात पाठवण्यात आले होते. 14 नोव्हेंबर रोजी पृथ्वीवर परतण्यापूर्वी त्यांना अंतराळ स्थानकावर एका विशेष अधिवासात ठेवण्यात आले होते. पृथ्वीवर परतल्यानंतर एका मादी उंदराने गर्भधारणा केली आणि 10 डिसेंबर रोजी नऊ पिल्लांना जन्म दिला. यापैकी सहा नवजात पिल्ले पूर्णपणे जिवंत आणि निरोगी आहेत, जो एक सामान्य दर मानला जातो. ही मादी उंदीर आपल्या पिल्लांना सामान्यपणे दूध पाजत असून, पिल्ले सक्रिय आणि निरोगी असल्याची माहिती संशोधकांनी दिली आहे.
‘चायनीज अॅकॅडमी ऑफ सायन्सेस’च्या प्राणीशास्त्र संस्थेतील संशोधक वांग होंगमेई यांनी सांगितले की, ‘या मोहिमेतून असे सिद्ध झाले आहे की, अल्पकालीन अंतराळ प्रवासामुळे उंदरांच्या पुनरुत्पादन क्षमतेवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही.’ त्या पुढे म्हणाल्या, ‘सस्तन प्राण्यांच्या विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर अंतराळ पर्यावरणाचा काय परिणाम होतो, हे तपासण्यासाठी हे नमुने अमूल्य आहेत. अंतराळातील सजीवांच्या शारीरिक प्रक्रिया, वाढ आणि पुनरुत्पादन यांचा अभ्यास करण्यासाठी उंदरांवरील प्रयोग हे आदर्श मॉडेल ठरतात.’