माद्रिद : स्पेनमध्ये पुरातत्त्वशास्त्रज्ञांना ६३ वर्षांपूर्वी सोन्याचा एक अमूल्य खजिना सापडला होता. हा खजिना उत्खननाचे काम सुरू असताना मिळाला होता आणि यात केवळ दागिन्यांचा समावेश नव्हता, तर सोन्यापासून बनवलेल्या अशा वस्तूही होत्या ज्या सामान्य आयुष्यात लोकांच्या उपयोगी पडत, जसे की भांडी. हे सोने कांस्य युगातील होते. पुढील अनेक वर्षे या खजिन्याची ओळख याच स्वरूपात राहिली, परंतु हा खजिना सापडण्याच्या तब्बल ६० वर्षांनंतर त्याचे खरे रहस्य उघड झाले.
या खजिन्यात डझनभर सोन्याचे कटोरे, सुरई आणि बांगड्या यांसारख्या अनेक वस्तू होत्या. परंतु, या सर्वांच्यामध्ये एक वक्र पट्टी आणि एक छोटा पोकळ गोळादेखील होता. या दोन्ही वस्तूंवर मोठ्या प्रमाणावर गंज लागला होता. ६० वर्षांनंतर जेव्हा त्यावर रासायनिक चाचण्या करण्यात आल्या, तेव्हा असे लक्षात आले की, या दोन वस्तू सोन्याच्या बनवलेल्या नसून त्या अंतराळातून आलेल्या उल्कापिंडाच्या लोखंडापासून तयार करण्यात आल्या आहेत. या खजिन्याला ‘विलेनाचा खजाना’ (Treasure of Villena) मानले जाते. विलेनाजवळ एका स्थानिक पुरातत्त्वशास्त्रज्ञ जोस मारिया सोलेर यांनी शोधून काढला होता. हा खजिना पुढील अनेक वर्षे विलेनाच्या संग्रहालयातच ठेवण्यात आला होता.
हा संपूर्ण खजिना सुमारे १० किलो वजनाचा होता, ज्यामध्ये ९ किलो केवळ सोनेच होते. हा खजिना आयबेरियन द्वीपकल्पावर प्रागैतिहासिक काळातील सोन्याचा सर्वात समृद्ध शोध मानला गेला आहे. काही तज्ज्ञ याला ग्रीसमधील माइसेना येथील शाही कबरींनंतर युरोपमधील दुसरा सर्वात मोठा खजिनादेखील मानतात. यामध्ये ११ कटोरे, ३ सुरई आणि एक डझन ब्रेसलेटचा समावेश होता. यातील अनेक वस्तू २३.५ कॅरेट सोन्याच्या बनवलेल्या होत्या. सुमारे ६० वर्षांनंतर संग्रहालयाचे निवृत्त संरक्षक साल्वाडोर यांनी या रहस्यमय धातूची तपासणी करण्याचा निर्णय घेतला.
संशोधक इग्नासियो मोंटेरो रुईझ आणि मार्टिना रेन्जी यांच्यासोबत काम करताना त्यांनी तो रहस्यमय धातू नेमका काय आहे, याचा शोध लावलाच. त्यांची ही अभ्यासपूर्ण संशोधन माहिती ‘ट्राबाजोस डे प्रहिस्टोरिया’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाली होती. याला ‘स्पेस मेटल’ (अवकाशातील धातू) मानण्याचे कारण म्हणजे, पृथ्वीवर खनन केलेल्या लोखंडाच्या तुलनेत उल्कापिंडांमध्ये निकेलचे प्रमाण जास्त असते. या वस्तूंमध्येही एक विशिष्ट लोह-निकेल संमिश्र धातू आढळला, जो हा स्रोत उल्कापिंडाचाच असल्याच्या दाव्याला पुष्टी देतो. मात्र, याविषयी अद्याप आणखी काही चाचण्या घेणे बाकी आहे.