मॉस्को : 53 वर्षे जुने असणारे मूळतः शुक्र ग्रहाकडे पाठवले गेले शीतयुद्ध काळातील ‘कोस्मोस 482’ हे सोव्हिएत अवकाशयान अखेर पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करून समुद्रात कोसळले. रशियाच्या रोस्कॉस्मॉस या अंतराळ संस्थेने याला दुजोरा दिला. भारताच्या अंदमान बेटांपासून सुमारे 560 किमी पश्चिमेकडे, भारतीय महासागरात रशियन प्रमाणवेळेनुसार सकाळी 9 वाजून 24 मिनिटांनी सदर अवकाशयान कोसळल्याची माहिती संशोधकांनी दिली.
शुक्र ग्रहासाठी पाठवले गेलेले पण पृथ्वीभोवती अडकले होते. 1972 मध्ये सोव्हिएत युनियनने प्रक्षेपित केलेले हे यान जवळजवळ 500 किलोग्रॅम वजनाचे होते. मात्र, प्रक्षेपणानंतर त्याच्या टाइमरमध्ये बिघाड झाल्यामुळे इंजिन वेळेआधीच बंद झाले आणि यान शुक्र ग्रहाच्या दिशेने जाण्याऐवजी संपूर्ण 53 वर्षे पृथ्वीच्या कक्षेत अडकून राहिले.
शुक्र ग्रहावरील कडक दाब, उष्णता आणि गती सहन करण्यासाठी सदर यान सक्षम करण्यात आले होते. त्यामुळे, वैज्ञानिकांनी असा अंदाज वर्तवला होता की हे यान पुन्हा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यावरही पूर्णपणे नष्ट न होता काही भाग वाचू शकतो. या यानाच्या कोसळण्याच्या शक्यतेवर काही दिवस चर्चा चालू होती. काही अहवालांनुसार, हे यान जमिनीवर कोसळू शकते अशी भीती होती; मात्र ते अखेरीस समुद्रातच कोसळले. रोस्कॉस्मॉसने टेलिग्रामवर दिलेल्या माहितीनुसार, कोस्मोस-482 हे यान, जे 1972 मध्ये प्रक्षिप्त झाले होते, आता अस्तित्वात नाही. ते पृथ्वीवर कोसळून भारतीय महासागरात पडले आहे. याच्या हालचाली ऑटोमेटेड वॉर्निंग सिस्टीम फॉर हॅझर्डस सिच्युएशन्स इन नियर-अर्थ स्पेस या प्रणालीने लक्षात घेतल्या होत्या.
युरोपियन स्पेस एजन्सीच्या स्पेस डेबि-स ऑफिसने देखील यानाच्या पृथ्वीमध्ये परत येण्याची पुष्टी केली होती. याचे कारण म्हणजे ते जर्मनीतील रडार स्थानकावर दिसले नव्हते. नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सी या संस्थांनी देखील सदर यान 13 मे पर्यंत कोसळेल, असा अंदाज वर्तवला होता, तो यामुळे खरा ठरला. शास्त्रज्ञांनी यानाच्या कक्षेच्या आधारावर असे म्हटले की हे यान विषुववृत्ताच्या 52 अंश उत्तर किंवा दक्षिण मध्ये कोसळू शकते. हा भाग पृथ्वीवरील बहुतांश भूभाग आणि समुद्र भाग व्यापतो.