South Korean Robot Dog | एकाच चार्जिंगमध्ये पूर्ण मॅरेथॉन धावणारा दक्षिण कोरियाचा ‘रोबो डॉग’!  
विश्वसंचार

South Korean Robot Dog | एकाच चार्जिंगमध्ये पूर्ण मॅरेथॉन धावणारा दक्षिण कोरियाचा ‘रोबो डॉग’!

पुढारी वृत्तसेवा

सेऊल : दोन वर्षांपूर्वी दक्षिण कोरियातील डोंगराळ आणि चढ-उताराच्या रस्त्यांवर एका चार पायांच्या रोबोने एकाच बॅटरी चार्जमध्ये ४२.२ किलोमीटरची (२६.२ मैल) पूर्ण मॅरेथॉन यशस्वीरीत्या पूर्ण केली होती. या अभूतपूर्व कामगिरीमागील रहस्य आणि तांत्रिक माहिती आता वैज्ञानिकांनी उघड केली आहे.

‘रायबो २’ नावाच्या या ‘रोबो डॉग’ने २२ व्या ‘सांगजू ड्राय-पर्सिमॉन मॅरेथॉन’मध्ये ४ तास १९ मिनिटांत हे अंतर पार केले होते. कोणत्याही अडथळ्याविना किंवा पुन्हा चार्ज न करता अधिकृत मॅरेथॉन पूर्ण करणारा हा जगातील पहिलाच चार पायांचा रोबो ठरला आहे. पुढे आणि मागे चार पाय असल्यामुळे त्यांच्या हालचाली कुत्र्यासारख्या दिसतात, म्हणूनच त्यांना ‘रोबो डॉग’ म्हटले जाते. २३ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध ‘नेचर’ या आंतरराष्ट्रीय मासिकात (जर्नल) प्रकाशित झालेल्या अभ्यासात संशोधकांनी या कामगिरीची सविस्तर माहिती दिली आहे. ही घटना १७ नोव्हेंबर २०२४ रोजी घडली होती. चार पायांच्या रोबोंसमोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजेच ‘सहनशक्ती’ पार करण्यात हा मैलाचा दगड ठरला आहे.

चाकांवर चालणारे रोबो सहज चालतात; परंतु चार पायांचे रोबो पायऱ्या किंवा खडकाळ भागातून चालू शकत असले तरी, स्वतःचे वजन पेलण्यासाठी आणि समतोल राखण्यासाठी त्यांना प्रचंड ऊर्जा लागते. ही मॅरेथॉन ५० मीटर उंच चढ आणि १० अंशांपर्यंत उतार असलेल्या कठीण रस्त्यांवर आयोजित करण्यात आली होती. अशा चढ-उतारांमुळे रोबोच्या बॅटरीवर प्रचंड ताण आला होता. हा रोबो इतर मानवी धावपटूंसोबत प्रत्यक्ष रस्त्यावर धावत होता.

संशोधकांनी सांगितले की, याआधी एका सपाट मैदानावर ‘रायबो २’ ने एका चार्जमध्ये २६.७ मैल (४३ किमी) अंतर ४ तास ४० मिनिटांत पार केले होते. मात्र, जेव्हा त्याला इतर धावपटूंसोबत विषम रस्त्यावर धावण्यासाठी उतरवण्यात आले, तेव्हा ३७ किलोमीटर (२३ मैल) अंतरावर त्याची बॅटरी संपली होती आणि ती शर्यत मध्येच सोडावी लागली होती. त्यावेळी इतर धावपटूंच्या वेगाशी जुळवून घेण्यासाठी रोबोला वारंवार आपला वेग बदलावा लागला होता, ज्यामुळे बॅटरी लवकर संपली. या अपयशातून धडा घेऊन संशोधकांनी रोबोच्या बॅटरी व्यवस्थापनात आणि ऊर्जा नियंत्रणात महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आणि हा नवा जागतिक विक्रम रचला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT