वॉशिंग्टन डीसी : सूक्ष्म प्लास्टिकचे (मायक्रो प्लास्टिक) कण वातावरणात तरंगत असून, संपूर्ण जगभर पसरत आहेत. मात्र त्यांच्या उत्पत्तीबाबत आतापर्यंत असलेला समज चुकीचा असल्याचे नवीन संशोधनातून समोर आले आहे. समुद्रापेक्षा जमिनीवरून 20 पटीने अधिक सूक्ष्म प्लास्टिकचे कण हवेत उत्सर्जित होतात, असा निष्कर्ष व्हिएन्ना विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी काढला आहे.
शास्त्रज्ञांच्या मते, जमिनीवरील स्रोतांमधून हवेत सोडले जाणारे सूक्ष्म प्लास्टिकचे कण हे समुद्रातून बाहेर पडणार्या कणांच्या तुलनेत 20 पट जास्त आहेत. हे संशोधन प्रसिद्ध नेचर या नियतकालिकात प्रकाशित झाले आहे. संशोधनाच्या मुख्य लेखिका इओआना इव्हँजेलौ यांनी एक महत्त्वाची बाब मांडली. जरी कणांची संख्या जमिनीवर जास्त असली, तरी समुद्रातून उत्सर्जित होणार्या प्लास्टिकचे एकूण वजन जास्त असते, कारण समुद्रातील कणांचा आकार जमिनीवरील कणांपेक्षा मोठा असतो.
जुने अंदाज ठरले चुकीचे
यापूर्वीच्या संगणकीय मॉडेल्सनी वातावरणात किती प्लास्टिक आहे, याचा अवास्तव अंदाज लावला होता. नवीन संशोधनानुसार, जुन्या मॉडेल्सनी कणांच्या प्रमाणाबाबत केलेली आकडेवारी प्रत्यक्ष निरीक्षणापेक्षा खूपच जास्त होती. हवेतील हे सूक्ष्म कण प्रामुख्याने गाड्यांच्या टायरची झीज (रस्त्यावर टायर घासल्यामुळे तयार होणारे अतिसूक्ष्म कण), कपड्यांचे तंतू (कृत्रिम धाग्यांच्या कपड्यांमधून बाहेर पडणारे कण), प्रदूषित जमीन आणि समुद्र (यापूर्वीच प्रदूषित झालेल्या जमिनीवरून आणि समुद्राच्या लाटांतून हे कण पुन्हा हवेत फेकले जातात) यातून तयार होतात.
वातावरणातील हे कण वार्यासोबत दुर्गम भागांतही पोहोचतात. माणूस आणि प्राणी श्वसनाद्वारे हे कण शरीरात घेतात, ज्यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवण्याची भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. हवेतून हे कण पुन्हा जमीन आणि समुद्रात पडल्यामुळे प्रदूषणाचे चक्र सुरूच राहते. संशोधक अँड्रियास स्टोहल यांच्या मते, सूक्ष्म प्लास्टिकचा उगम नेमका कोठून होतो (वाहतूक की इतर स्रोत), हे समजण्यासाठी अजून मोठ्या प्रमाणात डेटा आणि निरीक्षणांची गरज आहे. कणांच्या आकाराचे वितरण व वातावरणातून वाहून जाणार्या प्लास्टिकचे एकूण प्रमाण यांबाबत अद्यापही काही अनिश्चितता कायम आहे.