चेन्नई : तामिळनाडूमधील एका शेतकरी मुलाने आपल्या ७० वर्षीय वडिलांसाठी केलेल्या अनोख्या कामाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. वडिलांना रोज ताडाच्या झाडावर चढताना होणारा धोका लक्षात घेऊन मुलाने तब्बल ५५ फूट उंच झाडाभोवती मजबूत लोखंडी सर्पिल जिना उभारला आहे. या कल्पकतेचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत असून, नेटकरी मुलाच्या कर्तव्यभावनेचे कौतुक करत आहेत. ही घटना तामिळनाडूतील सलैपुथूर गावातील आहे. दिनाकर नावाच्या शेतकऱ्याचे कुटुंब अनेक पिढ्यांपासून ताडाच्या झाडांमधून रस काढण्याच्या व्यवसायात कार्यरत आहे. त्यांच्या ७० वर्षीय वडिलांना वाढत्या वयामुळे उंच झाडावर चढणे धोकादायक ठरत होते.
वडिलांची अडचण ओळखून दिनाकर यांनी झाडाभोवती मजबूत लोखंडी जिना बसवण्याचा निर्णय घेतला. या जिन्यामुळे आता वडिलांना कोणताही मोठा धोका न पत्करता सहज आणि सुरक्षितपणे झाडावर चढता येत आहे. या अनोख्या उपक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून, हजारो लोकांनी मुलाच्या संवेदनशीलतेचे आणि पालकांप्रति असलेल्या प्रेमाचे कौतुक केले आहे. अनेकांनी ‘‘हीच खरी पालकसेवा’’ आणि ‘‘प्रत्येक मुलाने यातून प्रेरणा घ्यावी’’ अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. वाढत्या वयातील पालकांची सुरक्षितता आणि सन्मान जपत त्यांच्या कामात मदत करण्याचा हा अनोखा प्रयत्न अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत असून, तंत्रज्ञान आणि कल्पकतेचा वापर करून दैनंदिन आयुष्य अधिक सुरक्षित कसे करता येते, याचे हे एक उत्तम उदाहरण मानले जात आहे.