वॉशिंग्टन : संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात एका नव्या युगाची नांदी झाली आहे. अमेरिकेतील आघाडीची टेक स्टार्टअप कंपनी ‘स्कायड्वेलर एअरो’ आणि संरक्षण प्रणालीमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेली फ्रेंच कंपनी ‘थेल्स’ यांनी एकत्र येऊन एका अशा ड्रोनची निर्मिती केली आहे, जो सागरी सुरक्षेची व्याख्याच बदलून टाकेल. हा ड्रोन केवळ सौरऊर्जेवर चालणार असून, एकदा आकाशात झेपावल्यावर तब्बल 90 दिवस किंवा त्याहूनही अधिक काळ म्हणजे सलग तीन महिने अविरतपणे उड्डाण करण्याची क्षमता ठेवतो.
‘स्कायड्वेलर’ नावाच्या या ड्रोनची रचनाच मुळात थक्क करणारी आहे. या ड्रोनला ऊर्जा पुरवण्यासाठी त्याच्या पंखांवर तब्बल 2,900 चौरस फूट (270 चौरस मीटर) जागेत 17,000 हून अधिक सोलर सेल्स बसवण्यात आल्या आहेत. याचा पंखविस्तार 236 फूट (72 मीटर) असून, तो प्रवासी विमान बोईंग 747 पेक्षाही 25 फुटांनी जास्त आहे. दिवसा सूर्यप्रकाशात या सोलर सेल्स 100 किलोवॅटपर्यंत वीज निर्माण करतात. या ऊर्जेचा वापर ड्रोनला उडवत ठेवण्यासाठी, त्यावरील उपकरणे चालवण्यासाठी आणि रात्रीच्या प्रवासासाठी बॅटरी चार्ज करण्यासाठी केला जातो.
रात्रीच्या वेळी उड्डाण सुरू ठेवण्यासाठी या ड्रोनमध्ये तब्बल 1,400 पौंड (635 किलो) वजनाच्या बॅटरी बसवण्यात आल्या आहेत. यामुळे ‘स्कायड्वेलर’ला जमिनीवर न उतरता अनेक महिने आकाशातच राहणे शक्य होणार आहे. एका जम्बो जेटएवढा पंख विस्तार असूनही, ‘स्कायड्वेलर’चे वजन थक्क करण्याइतके कमी आहे. पूर्ण क्षमतेने भरलेल्या बोईंग 747 चे वजन 400 टन असते, तर ‘स्कायड्वेलर’चे कमाल वजन केवळ 2.5 मेट्रिक टन आहे, म्हणजेच जम्बो जेटपेक्षा 160 पटीने कमी! हा ड्रोन सामान्यतः 24,600 ते 34,400 फूट (7,500 ते 10,500 मीटर) उंचीवरून उडतो.
दिवसा तो 44,600 फूट (13,600 मीटर) उंचीपर्यंत जाऊ शकतो, तर रात्री ऊर्जेची बचत करण्यासाठी तो आपली उंची 4,900 ते 9,800 फुटांनी कमी करतो. सौरऊर्जेवर चालणार्या विमानांची संकल्पना नवीन नाही. परंतु, यापूर्वीच्या अनेक डिझाईन्सना हवेच्या दाबामुळे आणि वातावरणातील बदलांमुळे अपघात झाले होते. विशेषतः, मध्यम उंचीवर (सुमारे 6,500 ते 32,800 फूट) चढताना किंवा उतरताना विमानाची रचना कोसळण्याचा धोका होता. ‘स्कायड्वेलर’ची रचना याच आव्हानावर मात करण्यासाठी केली आहे. हे ड्रोन पूर्णपणे कार्बन फायबरपासून बनवलेले आहे, जे वजनाने हलके, पण अत्यंत मजबूत असते.
तसेच, हवेतील दाबामुळे विमानावर येणारा ताण कमी करण्यासाठी यात ‘ऑटोमॅटिक गस्ट-लोड अॅलिव्हिएशन’ नावाची विशेष सॉफ्टवेअर प्रणाली वापरण्यात आली आहे. यामुळे ड्रोन कोणत्याही वातावरणात स्थिर राहू शकते. यासोबतच, हे ड्रोन 800 पौंड (362 किलो) वजनाची टेहळणी उपकरणे वाहून नेऊ शकते. हे तंत्रज्ञान यशस्वी झाल्यास सागरी सीमांची पाळत ठेवणे, घुसखोरी रोखणे आणि आपत्कालीन परिस्थितीत मदत पोहोचवणे अधिक सोपे आणि प्रभावी ठरणार आहे. ‘स्कायड्वेलर’ हे केवळ एक ड्रोन नसून, भविष्यातील हवाई टेहळणी आणि संरक्षणाचा एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरू शकते.