वॉशिंग्टन : पृथ्वीवरील सर्वात कोरड्या ठिकाणांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणार्या ‘अटाकामा’ वाळवंटात नुकतीच एक निसर्गाची अजब किमया पाहायला मिळाली. या भागात झालेल्या दुर्मीळ हिमवृष्टीमुळे ओसाड आणि खडकाळ जमीन पांढर्या शुभ्र चादरीने झाकली गेली आहे. या हिमवृष्टीचा परिणाम इतका मोठा होता की, जगातील सर्वात शक्तिशाली रेडिओ टेलिस्कोपपैकी एक असलेल्या केंद्राचे कामकाज तात्पुरते बंद करावे लागले.
दक्षिण अमेरिकेतील चिली देशात वसलेले अटाकामा वाळवंट सुमारे 1,05,000 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले आहे. हे जगातील सर्वात जुने नॉन-पोलर (ध्रुवीय नसलेले) वाळवंट असून, गेल्या 15 कोटी वर्षांपासून ते निम-ओसाड स्थितीत आहे. या वाळवंटातील ‘अल्टिप्लानो पठार’ हे जगातील सर्वात जास्त सूर्यप्रकाश असणारे ठिकाण मानले जाते; येथील सूर्यप्रकाशाची तीव्रता चक्क शुक्र ग्रहावरील प्रकाशाइतकी असते.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस्नुसार, या वाळवंटातील काही भागांत वर्षाला केवळ 0.5 मिलीमीटर पाऊस पडतो. धक्कादायक बाब म्हणजे 1570 ते 1971 दरम्यान, म्हणजे जवळपास 400 वर्षे, या वाळवंटाच्या काही भागात पावसाचा एक थेंबही पडला नव्हता. मात्र, 25 जून रोजी उत्तरेकडून आलेल्या एका अनपेक्षित ‘कोल्ड-कोअर चक्रीवादळामुळे’ अर्ध्याहून अधिक वाळवंट बर्फाच्या थराने व्यापले गेले.
‘नासा’च्या अर्थ ऑब्झर्व्हेटरीने या दुर्मीळ घटनेची सॅटेलाईट छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. या वाळवंटातील ‘चाजनंटोर पठार’ हे समुद्रसपाटीपासून 16,000 फूट उंचीवर आहे. या ठिकाणी ‘अटाकामा लार्ज मिलिमीटर/ सबमिलिमीटर अॅरे’ ही मोठी वेधशाळा आहे. या वेधशाळेत 50 पेक्षा जास्त रेडिओ डिशेस असून, त्या विश्वातील गुपितांचा शोध घेतात. परंतु, बर्फ साचल्यामुळे या वेधशाळेला ‘सर्व्हायव्हल मोड’मध्ये जावे लागले.