Snow Moon Regulus Occultation | ‘स्नो मून’ तेजस्वी ‘रेग्युलस’ तार्‍याला गिळंकृत करणार 
विश्वसंचार

Snow Moon Regulus Occultation | ‘स्नो मून’ तेजस्वी ‘रेग्युलस’ तार्‍याला गिळंकृत करणार

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : पूर्व उत्तर अमेरिकेतील आकाशप्रेमींना या आठवड्यात एक अत्यंत दुर्मीळ द़ृश्य पाहण्याची संधी मिळणार आहे. रविवारी, 1 फेब्रुवारी रोजी पूर्ण चंद्र (स्नो मून) दिसल्यानंतर, सोमवारी (2 फेब्रुवारी) रात्री हा चंद्र सिंह राशीतील सर्वात तेजस्वी तारा ‘रेग्युलस’ याच्या समोरून जाणार आहे. या प्रक्रियेला खगोलशास्त्रात ‘लुनार ऑकल्टेशन’ किंवा चंद्रपिधान असे म्हणतात.

जेव्हा चंद्र पृथ्वी आणि एखाद्या तार्‍याच्या मध्ये येतो, तेव्हा तो तारा काही काळासाठी चंद्राच्या मागे लपला जातो. सोमवारी रात्री हा तेजस्वी तारा चंद्राच्या एका बाजूने अद़ृश्य होईल आणि साधारण एका तासानंतर दुसर्‍या बाजूने पुन्हा प्रकट होईल. ही घटना प्रामुख्याने अमेरिका आणि कॅनडाच्या पूर्व भागातून, मध्य-पश्चिम भागापासून ते पूर्व किनारपट्टीपर्यंत साध्या डोळ्यांनी पाहता येईल. याशिवाय वायव्य आणि पश्चिम आफ्रिकेतूनही हे द़ृश्य दिसेल.

न्यूयॉर्क, टोरंटो आणि बोस्टन सारख्या शहरांमध्ये ही घटना रात्री 8.40 ते 10.05 (EST) दरम्यान घडेल. उदाहरणार्थ, न्यूयॉर्कमध्ये रेग्युलस रात्री 8.51 वाजता अद़ृश्य होईल आणि 9.54 वाजता पुन्हा दिसेल. ही घटना साध्या डोळ्यांनी दिसणार असली, तरी बायनॉक्युलर्स किंवा लहान टेलिस्कोपच्या मदतीने हा अनुभव अधिक खास असेल. इंग्रेस (Ingress): जेव्हा रेग्युलस तारा चंद्राच्या तेजस्वी कडेपाशी पोहोचेल आणि चंद्राच्या मागे लुप्त होईल. इग्रेस (Egress): साधारण तासाभरानंतर तारा चंद्राच्या दुसर्‍या बाजूने बाहेर येईल, तो क्षण अधिक प्रभावी असेल. रेग्युलस तार्‍याच्या पिधानाची ही मालिका गेल्या वर्षापासून सुरू आहे; परंतु उत्तर अमेरिकेतून सहजपणे दिसणारी ही या वर्षातील एकमेव घटना आहे. यानंतर 17 जून रोजी चंद्राद्वारे शुक्राचे पिधान होणार आहे; परंतु ते दिवसा घडणार असल्याने उत्तर अमेरिकेतून दिसणार नाही. त्यामुळे या आठवड्यातील ही रात्र खगोलप्रेमींसाठी मोठी मेजवानी ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT