Snake Audition | नाटकातील भूमिकेसाठी सापांचेही झाले ऑडिशन!  
विश्वसंचार

Snake Audition | नाटकातील भूमिकेसाठी सापांचेही झाले ऑडिशन!

‘प्रिन्सेस’ नावाच्या महाकाय सापाने मारली बाजी

पुढारी वृत्तसेवा

न्यूयॉर्क : न्यूयॉर्कमधील ‘मेट्रोपॉलिटन ओपेरा’ हे जगातील अत्यंत प्रसिद्ध ओपेरा हाऊस मानले जाते. या मंचावर सादरीकरण करणाऱ्या कलाकारांना सहसा कठीण ऑडिशन प्रक्रियेतून जावे लागते. परंतु, नुकत्याच झालेल्या एका ऑडिशनमध्ये भलताच प्रकार पाहायला मिळाला, ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. या भव्य मंचावर स्थान मिळवण्यासाठी एका सापाला चक्क रितसर ऑडिशन द्यावे लागले.

मोजार्ट यांच्या ‘कोझी फॅन तुत्ते’ या क्लासिक ओपेराच्या नव्या रूपांतरणासाठी ही ऑडिशन आयोजित करण्यात आली होती. या नाटकात १९५० च्या दशकातील ‘कोनी आयलंड’ कार्निव्हलची पार्श्वभूमी दाखवली जात असून, या सेटिंगमध्ये एका सापाची भूमिकाही कथानकाचा भाग आहे. ‘असोसिएटेड प्रेस’च्या अहवालानुसार, या संपूर्ण ऑडिशनची जबाबदारी ‘जोई जिगफिल्ड’ यांच्यावर होती. जिगफिल्ड हे स्वतः कार्निव्हल परफॉर्मर राहिलेले असून, या ओपेरा शोमध्ये ते ‘स्नेक हँडलर’ची (साप सांभाळणारा) भूमिका साकारत आहेत. ऑडिशनदरम्यान जिगफिल्ड यांनी एक-एक करून सापांना हातात घेतले, त्यांना आपल्या शरीरावर सरपटू दिले आणि डोक्यावर उचलून पाहिले.

मंचावरील तीव्र दिवे आणि गोंधळाच्या वातावरणात साप कसा व्यवहार करतो, हे तपासणे हा यामागील उद्देश होता. जिगफिल्ड यांच्यासाठी सापाचे केवळ मोठे किंवा सुंदर दिसणे पुरेसे नव्हते, तर तो माणसांसोबत शांत आणि सुरक्षित राहतो की नाही, हे पाहणे सर्वात महत्त्वाचे होते. जिगफिल्ड यांनी सांगितले की, साप कलाकारांच्या अत्यंत जवळ राहणार असल्यामुळे तो गर्दी, संगीत आणि मंचावरील प्रकाशात घाबरणार नाही, याची खात्री करणे गरजेचे होते. जर साप अस्वस्थ झाला, तर सादरीकरणात अडथळा येऊ शकतो. म्हणूनच सापांच्या हालचाली आणि प्रतिक्रियेचे बारीक निरीक्षण करण्यात आले.

अनेक सापांचे निरीक्षण केल्यानंतर अखेर ‘प्रिन्सेस’ नावाच्या एका ‘बोआ कॉन्स्ट्रिक्टर’ प्रजातीच्या सापाची निवड करण्यात आली. प्रिंसेस इतर सापांच्या तुलनेत आकाराने मोठी असून, मंचावर तिची उपस्थिती अधिक प्रभावी ठरते. सध्या तिला तालीम प्रक्रियेत समाविष्ट केले जाईल. तालमीदरम्यान तिची कामगिरी कशी राहते, यावरूनच तिची अंतिम निवड निश्चित होईल. प्रिन्सेससोबत ‘नाला’ नावाच्या दुसऱ्या एका लहान बोआ सापाचीही निवड करण्यात आली आहे. नाला ही प्रिंसेसची ‘अंडरस्टडी’ (पर्यायी कलाकार) म्हणून काम करेल. म्हणजेच एखाद्या शोमध्ये प्रिंसेस परफॉर्म करू शकली नाही, तर तिच्याऐवजी नाला मंचावर उतरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT