Snake With Spider-Like Tail | शेपटीवर खोटे कोळी बनवून शिकार करणारा साप! 
विश्वसंचार

Snake With Spider-Like Tail | शेपटीवर खोटे कोळी बनवून शिकार करणारा साप!

पुढारी वृत्तसेवा

शिकागो : निसर्गात आणि वन्यजीवांमध्ये टिकून राहण्यासाठी ‘नक्कल’ किंवा छद्मावरण ही एक अत्यंत महत्त्वाची युक्ती मानली जाते. काही पक्ष्यांची पिल्ले भक्षकांपासून वाचण्यासाठी विषारी अळ्यांचे रूप धारण करतात, तर ऑक्टोपस आणि स्क्विड यांसारखे जलचर सभोवतालच्या वातावरणात मिसळून जातात. वनस्पतीसुद्धा माशांना आकर्षित करण्यासाठी कुजलेल्या मांसासारखा वास सोडतात किंवा पाकळ्यांचा वापर करून परागीभवन घडवून आणतात. परंतु, इराणमध्ये आढळणारा ‘स्पायडर-टेल्ड हॉर्न्ड वायपर’ हा साप शिकार करण्यासाठी एक अत्यंत अनोखी युक्ती वापरतो. या सापाचे शेपूट अगदी हुबेहूब कोळ्यासारखे दिसते. पक्षी जेव्हा त्या ‘कोळ्याला’ खाण्यासाठी जवळ येतात, तेव्हा हा साप क्षणाचाही विलंब न लावता त्या पक्ष्याची शिकार करतो.

‘द ॲनाटोमिकल रेकॉर्ड’ या मासिकात प्रसिद्ध झालेल्या नवीन अभ्यासाने या अद्‌भुत सापाच्या रचनेचे रहस्य उघड केले आहे. शिकागो येथील ‘फील्ड म्युझियम’च्या संशोधकांनी X-ray computed tomography (XCT) स्कॅनरच्या मदतीने या सापाच्या शेपटाच्या अंतर्भागाचा अभ्यास केला. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, शेपटाची बाह्य रचना कोळ्यासारखी दिसत असली, तरी आतील हाडांची रचना इतर सामान्य सापांसारखीच आहे. या सापाचा शोध आणि ओळख हा एक रंजक प्रवास आहे. १९६८ मधील पहिला नमुना : वैज्ञानिकांना १९६८ मध्ये या सापाचा पहिला नमुना सापडला होता. जेव्हा तो फील्ड म्युझियममध्ये आणला गेला, तेव्हा लोकांचा असा समज झाला की, या सापाच्या शेपटाच्या टोकाला कोणतीतरी गाठ किंवा व्यंग असावे.

दशकांची प्रतीक्षा : हा नमुना अनेक दशके संग्रहालयात तसाच पडून राहिला. मात्र, २००३ मध्ये जेव्हा अगदी तशाच शेपटाचा दुसरा साप सापडला, तेव्हा संशोधकांनी पुन्हा एकदा यावर अभ्यास सुरू केला. २००६ मध्ये नवीन प्रजाती घोषित : २००६ मध्ये वैज्ञानिकांनी या सापाची अधिकृतपणे नवीन प्रजाती म्हणून नोंद केली आणि फील्ड म्युझियममधील नमुन्याला मुख्य संदर्भ (Holotype) म्हणून घोषित केले. २००८ मध्ये शिकार करतानाचा व्हिडीओ : या प्रजातीचे नाव ठेवल्यानंतर लगेचच सापाने शेपटाच्या टोकाचा वापर करून पक्ष्यांना कसे जाळ्यात ओढले याचा व्हिडिओ संशोधकांनी चित्रित केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT