नवी दिल्ली : पावसाळ्यात किंवा बागेत फिरताना आपण अनेकदा गोगलगाय (स्नेल) पाहतो. हा अत्यंत संथ चालणारा आणि छोटासा जीव पाहून अनेकांना किळस येते. मात्र, निसर्गाची ही एक अशी इंजिनिअरिंग आहे, ज्याबद्दल जाणून घेतल्यास तुमचे डोळे विस्फारल्याशिवाय राहणार नाहीत. शास्त्रज्ञांच्या मते, एका छोट्याशा गोगलगायीच्या तोंडात इतके दात असतात की, त्यांची मोजणी करताना मानवाचेही भान हरपेल.
20 हजारांहून अधिक दातांचा मालक!
आपल्याला वाटते की गोगलगाय केवळ मऊ शरीराचा गोळा आहे; पण या छोट्याशा जीवाच्या तोंडात 14 हजार ते 24 हजारपर्यंत दात असू शकतात. एका सामान्य गार्डन स्नेलमध्ये (बागेतील गोगलगाय) सुमारे 14 हजार दात असतात, तर काही समुद्री प्रजातींमध्ये ही संख्या 20 ते 25 हजारांच्या पुढे जाते. हे दात इतके सूक्ष्म असतात की ते उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत; त्यांना पाहण्यासाठी मायक्रोस्कोपची गरज भासते. गोगलगायीच्या तोंडात रेडुला नावाची एक लवचिक पट्टी असते. ही पट्टी एखाद्या करवतीसारखी किंवा जीभेसारखी काम करते. या रेडुलावर दातांच्या सुमारे 120 रांगा असतात आणि प्रत्येक रांगेत 100 हून अधिक दात असतात. गोगलगाय आपले अन्न चघळत नाही, तर या दातांच्या मदतीने ते खुरचून खाते.
शार्कपेक्षाही शक्तिशाली दात! स्टीललाही पाडतो छिद्र
गोगलगायीचे दात चिटिन नावाच्या अत्यंत कडक पदार्थापासून बनलेले असतात. काही प्रजातींचे दात इतके मजबूत असतात की, ते स्टीलच्या पृष्ठभागालाही ओरखडा पाडू शकतात. शार्क माशाप्रमाणेच गोगलगायीचे दातही सतत बदलले जातात. जुने दात झिजले किंवा पडले की मागून नवीन दात येतात. आपल्या संपूर्ण आयुष्यात एक गोगलगाय लाखो दात बदलू शकते. गोगलगाय हा केवळ पाने खाणारा जीव नाही. काही गोगलगाय दगड-गोट्यांवर वाढलेले शेवाळ स्वच्छ करतात, तर काही सडलेले पदार्थ आणि लहान जीवही खुरचून खातात. त्यांच्या या वैशिष्ट्यामुळेच शास्त्रज्ञ आता गोगलगायच्या दातांच्या संरचनेचा अभ्यास करून त्यापासून अत्यंत मजबूत आणि लवचिक साहित्य (न्यू मटेरियल) बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या गोगलगायीला आपण साधा छोटा जीव समजून दुर्लक्ष करतो, तो प्रत्यक्षात दातांच्या बाबतीत जगातील सर्वात समृद्ध जीवांपैकी एक आहे.