Smartwatch Detects Disease | छातीत दडला होता प्राणघातक आजार; स्मार्टवॉचने वाजवली धोक्याची घंटी 
विश्वसंचार

Smartwatch Detects Disease | छातीत दडला होता प्राणघातक आजार; स्मार्टवॉचने वाजवली धोक्याची घंटी

पुढारी वृत्तसेवा

न्यूयॉर्क : आजच्या डिजिटल युगात स्मार्टवॉच ही केवळ वेळ पाहण्यासाठी किंवा कॉल घेण्यासाठी मर्यादित राहिलेली नसून, ती मनगटावर बांधलेला एक ‘लाईफसेवर’ (जीव वाचवणारा) गॅझेट ठरत आहे. असाच एक थक्क करणारा प्रकार समोर आला असून, ट्रायथलॉनची तयारी करणाऱ्या एका फिट एथलीटला वर्कआऊटदरम्यान स्मार्टवॉचने दिलेल्या अलर्टमुळे त्याचा प्राणघातक आजार ऐनवेळी समोर आला आणि योग्य वेळी ओपन हार्ट सर्जरी झाल्याने त्याचे प्राण वाचले.

ॲपलच्या यूट्यूब चॅनेलवर शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडीओमध्ये कॉनर नावाच्या धावपटूने आपला अनुभव सांगितला आहे. ट्रायथलॉनच्या ट्रेनिंगदरम्यान हृदयाचे ठोके अचानक तीव्र झाल्यानंतर त्याच्या ॲपल वॉचने ‘ॲट्रियल फायब्रिलेशन’ (Atrial Fibrillation) म्हणजेच हृदयाच्या असामान्य धडधडीचे संकेत पकडले. कॉनरने सांगितले की, ट्रायथलॉनची संपूर्ण तयारी आणि कठोर मेहनत करूनही त्याची फिटनेस पातळी सतत घसरत होती. एका ट्रेनिंग सेशनदरम्यान त्याच्या हृदयाचे ठोके प्रति मिनिट २१९ (219 BPM) पर्यंत पोहोचले, ज्याकडे घड्याळाने लगेच लक्ष वेधले.

घड्याळातील ईसीजी रिपोर्ट पाहिल्यानंतर कॉनरने थेट डॉक्टरांचा सल्ला घेतला. सखोल तपासणीनंतर डॉक्टरांनी सांगितले की, त्याला हृदयाशी संबंधित एक जन्मजात/जुना आजार आहे, ज्याबद्दल त्याला आधी कोणतीही कल्पना नव्हती. परिस्थिती इतकी गंभीर होती की डॉक्टरांना तातडीने ओपन हार्ट सर्जरी करण्याचा निर्णय घ्यावा लागला. कॉनरने पुढे सांगितले, ‘‘हा माझ्या हृदयातील एक असा लपलेला आजार होता ज्याबद्दल मला काहीच माहिती नव्हते. यानंतर माझी ओपन हार्ट सर्जरी झाली. आता मला वाटत आहे की जणू माझ्या शरीराला नवीन इंजिन मिळाले आहे.

मी ॲपल वॉचचे जितके आभार मानू तितके कमीच आहेत, हे खरोखरच अप्रतिम आहे.’’ ॲपल वॉचचे ईसीजी ॲप घड्याळात बसवलेल्या सेन्सर्सच्या मदतीने हृदयाची इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी (इलेक्ट्रिकल सिग्नल) रेकॉर्ड करते. ही रेकॉर्डिंग तपासून ते ॲट्रियल फायब्रिलेशनसारख्या गंभीर लक्षणांची ओळख पटवू शकते. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की स्मार्टवॉच हा कोणत्याही डॉक्टर किंवा वैद्यकीय तपासणीचा पर्याय नाही. ईसीजी अलर्ट हा केवळ संभाव्य धोक्याकडे इशारा करू शकतो; मात्र अचूक निदान आणि उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचीच मदत घेणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT