Smartphone Use Children | वयाच्या तेराव्या वर्षांपूर्वीच स्मार्टफोन वापराने गंभीर मानसिक परिणाम Pudhari File Photo
विश्वसंचार

Smartphone Use Children | वयाच्या तेराव्या वर्षांपूर्वीच स्मार्टफोन वापराने गंभीर मानसिक परिणाम

नव्या संशोधनामधून मिळाला इशारा

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : जगभरातील एक लाखांहून अधिक लोकांवर केलेल्या एका मोठ्या अभ्यासात धक्कादायक खुलासा झाला आहे. यानुसार, वयाच्या 13 वर्षांपूर्वीच ज्या मुलांच्या हातात स्मार्टफोन येतो, त्यांच्या मानसिक आरोग्यावर आणि भविष्यावर गंभीर दुष्परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे.

‘जर्नल ऑफ ह्यूमन डेव्हलपमेंट अँड कॅपेबिलिटीज’मध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनानुसार, 18 ते 24 वयोगटातील असे तरुण, ज्यांना लहानपणी लवकर स्मार्टफोन मिळाला होता, त्यांच्यात इतरांपेक्षा जास्त आक्रमकता, वास्तवापासून दुरावा, आत्महत्येचे विचार आणि आत्मविश्वासाची कमतरता यांसारख्या समस्या मोठ्या प्रमाणात दिसून आल्या आहेत. अभ्यासात असेही आढळून आले की, हा धोका पुढील कारणांमुळे आणखी वाढतो: सोशल मीडियाचा लहान वयात वापर, सायबर बुलिंग (ऑनलाईन छळ), अपुरी झोप, कौटुंबिक संबंधांमधील तणाव. या कारणांमुळे मुलांच्या मानसिक विकासावर परिणाम होतो आणि मोठे झाल्यावर त्यांना गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागते.

सॅपियन लॅब्सच्या संस्थापक आणि न्यूरोसायंटिस्ट डॉ. तारा त्यागराजन यांनी सांगितले, ‘लहान वयात स्मार्टफोन आणि सोशल मीडियाचा वापर मुलांच्या मानसिक आरोग्यात मोठी घसरण आणत आहे. त्यांनी सरकारला आवाहन केले आहे की, 13 वर्षांखालील मुलांना स्मार्टफोन देऊ नये आणि ज्याप्रमाणे दारू आणि तंबाखूवर निर्बंध आहेत, त्याचप्रमाणे यावरही कठोर निर्बंध लादले जावेत.’ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अधिकृतपणे 13 वर्षांची वयोमर्यादा असली तरी, तिचे काटेकोरपणे पालन होत नाही. या धोक्याची जाणीव झाल्याने जगभरातील अनेक देश आता कठोर पावले उचलत आहेत.

फ्रान्स, इटली, नेदरलँड आणि न्यूझीलंड यांसारख्या देशांनी शाळांमध्ये फोनवर बंदी घातली आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्कनेही नुकतेच शाळांमध्ये स्मार्टफोनवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. संशोधकांच्या मते, लहान वयात हातात आलेला फोन केवळ मुलांची झोप आणि नातेसंबंधांवरच परिणाम करत नाही, तर त्यांच्या मानसिक आरोग्यावर दीर्घकाळ टिकणारे नकारात्मक परिणाम करतो. त्यामुळे येणार्‍या पिढीचे मानसिक आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी धोरणकर्त्यांनी तातडीने कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT