कांगो : १९७६ मध्ये जेव्हा 'इबोला' व्हायरसचा शोध लागला, तेव्हा त्याचे संकट केवळ काही शे लोकांपुरते मर्यादित होते. मात्र, आज चित्र पूर्णपणे बदलले आहे. २०१४ मध्ये पश्चिम आफ्रिकेत पसरलेल्या इबोलाने २८,००० हून अधिक लोकांना विळख्यात घेतले होते. तर सध्या डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो आणि युगांडामध्ये या आजाराने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. या वाढत्या उद्रेकाचे कारण केवळ वाढती लोकसंख्या नसून, आपल्या हातातील हाय-टेक गॅजेटस् आणि स्मार्टफोनसाठी लागणाऱ्या खनिजांची वाढती जागतिक भूक हे आहे.
इबोलाचा विषाणू प्रामुख्याने वटवाघळांमध्ये आढळतो. काँगोच्या घनदाट जंगलात राहणारी ही वटवाघळे पूर्वी मानवी वस्तीपासून दूर होती. जंगलात राहणाऱ्या स्थानिक लोकांमध्ये या विषाणूविरुद्ध काही प्रमाणात प्रतिकारशक्तीही तयार झाली होती. परंतु, जागतिक बाजारपेठेत सोने, कोबाल्ट आणि कोलतान यांसारख्या खनिजांची मागणी प्रचंड वाढल्याने काँगोतील जंगलांची बेसुमार कत्तल सुरू झाली आहे. उपग्रहांच्या साहाय्याने मिळालेल्या माहितीनुसार, २०२४-२५ मध्ये या भागात मोठ्या प्रमाणावर जंगलतोड झाली आहे. एका संशोधनानुसार, मध्य आफ्रिकेत जंगलतोड १ टक्क्याने वाढल्यास इबोला आणि मलेरियाचे प्रमाण २० ते ४० टक्क्यांनी वाढते.
काँगोमध्ये सुमारे २० लाख लोक 'आर्टिसनल मायनिंग' म्हणजेच अनधिकृत किंवा लहान प्रमाणावरील खाणकामात गुंतले आहेत. शेतीतील अनिश्चितता आणि गरिबीमुळे ३० टक्क्यांहून अधिक स्थानिक कुटुंबे या खाणकामाकडे वळली आहेत. शेतकरी सहसा जंगलाच्या कडेने झाडे तोडतात; परंतु खनिजांच्या शोधात जाणारे हे मजूर जंगलाच्या अगदी मध्यभागात (गाभ्यात) शिरतात.
या खाण मजुरांमध्ये इतर भागांतून आलेल्या लोकांचाही समावेश असतो, ज्यांच्याकडे इबोलाशी लढण्याची नैसर्गिक प्रतिकारशक्ती नसते. जंगलात अन्न न मिळाल्याने हे लोक वन्यजीवांची शिकार करतात, ज्यामुळे मानवी शरीर आणि संक्रमित प्राणी यांचा थेट संपर्क येतो. खाणकामाच्या ठिकाणी नसलेल्या आरोग्य सुविधा आणि अस्वच्छतेमुळे हा विषाणू वेगाने पसरतो. काँगोमधील 'मोंगब्वालू' या खाण क्षेत्राच्या आसपास झालेली जंगलतोड आणि तिथेच आढळलेले इबोलाचे रुग्ण हा याचा जिवंत पुरावा आहे. साथ आल्यावर उपाययोजना करण्यापेक्षा, ती उद्भवूच नये म्हणून निसर्गाचा समतोल राखणे गरजेचे आहे. आपण वापरत असलेल्या स्मार्टफोनमधील खनिजांची किंमत काँगोतील निष्पाप लोकांना आरोग्याच्या रूपाने मोजावी लागत आहे.