Smart Thread Technology | आता कपडेच होणार कॉम्प्युटर! शास्त्रज्ञांनी विकसित केला ‘स्मार्ट’ धागा Pudhari File Phto
विश्वसंचार

Smart Thread Technology | आता कपडेच होणार कॉम्प्युटर! शास्त्रज्ञांनी विकसित केला ‘स्मार्ट’ धागा

पुढारी वृत्तसेवा

लंडन : कल्पना करा की, तुम्ही घातलेला शर्ट तुमच्या हृदयाचे ठोके मोजत आहे किंवा तुमचा टी-शर्ट तुमच्या व्यायामाचा डेटा रेकॉर्ड करत आहे. ही कल्पना आता लवकरच सत्यात उतरू शकते. संशोधकांनी एकाच लवचिक धाग्यामध्ये कॉम्प्युटरचे सर्व प्रमुख घटक यशस्वीरीत्या समाविष्ट केले आहेत. विशेष म्हणजे, हा ‘स्मार्ट’ धागा केवळ अत्यंत लवचिक नाही, तर तो वॉशिंग मशिनमध्ये सहजपणे धुतला जाऊ शकतो. या क्रांतिकारी शोधामुळे भविष्यात आपले कपडेच ‘स्मार्ट’ उपकरणांमध्ये बदलू शकतात.

पूर्वीच्या तंत्रज्ञानातील मर्यादा

या क्षेत्रातील एक सुरुवातीचा प्रयत्न म्हणजे 2007 मध्ये तयार करण्यात आलेले ‘लिलीपॅड’ (LilyPad). हे शिलाई करण्यायोग्य इलेक्ट्रॉनिक घटकांची एक मालिका होती, जी विशेषतः इंटरॅक्टिव्ह कपडे, खेळणी किंवा शिल्पांमध्ये वापरण्यासाठी डिझाईन केली होती. मात्र, स्मार्ट टेक्सटाईलची सर्वात मोठी मर्यादा ही होती की, वैयक्तिक धाग्यांची संगणकीय क्षमता खूपच मर्यादित होती आणि त्यात कोणतेही स्वतंत्र घटक नव्हते. यामुळे, बायोसिग्नल्सचे (जैविक संकेतांचे) रिअल-टाईममध्ये विश्लेषण करणे किंवा पुढील डेटा प्रोसेसिंगसाठी सिग्नल अचूकपणे मिळवणे खूप कठीण होते.

नव्या संशोधनातून क्रांती

‘नॅनो-मायक्रो लेटर्स’ या जर्नलमध्ये 6 जून रोजी प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासात शास्त्रज्ञांनी एकाच फायबर स्ट्रँडमध्ये अनेक क्षमता एकत्र केल्या आहेत. या धाग्यात आता पुढील गोष्टी शक्य आहेत: सेन्सिंग : शरीरातील किंवा वातावरणातील सिग्नल ओळखणे. कम्युनिकेशन : माहितीची देवाणघेवाण करणे. कॉम्प्युटेशन : माहितीवर प्रक्रिया करणे. स्टोअरेज : डेटा साठवून ठेवणे.

हा प्रत्येक लवचिक धागा 60टक्केपर्यंत ताणला जाऊ शकतो आणि वॉशिंग मशिनमध्येही खराब होत नाही. याचा अर्थ असा की, या धाग्यांपासून दैनंदिन वापरासाठीचे कपडे विणले जाऊ शकतात. या नव्या धाग्यामुळे स्मार्ट कपडे किंवा उपकरणे अधिक अचूक बनतील, कारण ते एकाचवेळी अनेक ठिकाणांहून डेटा गोळा करू शकतील आणि मानव व कॉम्प्युटर यांच्यात रिअल-टाईम संवाद शक्य होईल. संशोधकांना आशा आहे की, भविष्यात असे अनेक धागे एकत्र विणून एक ‘फायबर कॉम्प्युटिंग’ नेटवर्क तयार करता येईल. सोप्या भाषेत सांगायचे, तर आपले कपडेच एक स्मार्ट आणि कार्यक्षम कॉम्प्युटर म्हणून काम करतील, ज्यामुळे आरोग्य, फिटनेस आणि दैनंदिन जीवनात मोठी क्रांती घडू शकते.

काय आहे ‘स्मार्ट टेक्स्टाईल’ तंत्रज्ञान?

स्मार्ट टेक्स्टाईल, ज्यांना स्मार्ट फॅब्रिक्स किंवा ई-टेक्स्टाईल म्हणूनही ओळखले जाते, हे असे साहित्य आहे ज्यात इलेक्ट्रॉनिक घटक असतात. हे घटक वेअरेबल डिव्हाईसेस (परिधान करण्यायोग्य उपकरणे) आणि इतर उत्पादनांची वैशिष्ट्ये वाढवतात. या तंत्रज्ञानाचा वापर करून कपड्यांमध्ये किंवा विणलेल्या डिस्प्लेमध्ये कॉम्प्युटिंग क्षमता असलेले साहित्य तयार केले जाऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT