Smallest Engine | सर्वात लहान इंजिन, सूर्यापेक्षा 2000 पट उष्ण 
विश्वसंचार

Smallest Engine | सर्वात लहान इंजिन, सूर्यापेक्षा 2000 पट उष्ण

पुढारी वृत्तसेवा

लंडन : वैज्ञानिकांनी विज्ञानाच्या जगात एक असा शोध लावला आहे, ज्यामुळे लोकांना आश्चर्य वाटत आहे. त्यांनी जगातील सर्वात लहान इंजिन तयार केले आहे, जे केवळ खास उपकरणांनीच पाहिले जाऊ शकते. विशेष म्हणजे ते सूर्याच्या पृष्ठभागापेक्षा 2000 पट अधिक तापमानापर्यंत पोहोचले. वैज्ञानिकांच्या या शोधामुळे थर्मोडायनॅमिक्सची (ऊष्मागतिकी) पारंपरिक समज बदलली जाऊ शकते आणि नॅनोटेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात क्रांती घडवता येऊ शकते.

संशोधकांच्या मते, त्यांनी या इंजिनला ‘मायक्रो इंजिन’ असे नाव दिले आहे. या इंजिनचा आकार इतका लहान आहे की ते केवळ खास उपकरणांनीच पाहिले जाऊ शकते. त्याचे कार्य दर्शवते की मायक्रो स्तरावर थर्मोडायनॅमिक्सचे नियम मोठ्या मशिन किंवा सामान्य जीवनासाठी असलेल्या नियमांसारखे नसतात. वास्तविक पाहता, हे इंजिन एका लहान भारीत कणावर (charged particle) आधारित आहे. वैज्ञानिकांनी या कणाला व्हॅक्यूममध्ये (पोकळीत) ठेवले आहे आणि त्यावर इलेक्ट्रिक फील्डचा (विद्युत क्षेत्राचा) वापर केला आहे.

या प्रक्रियेद्वारे, कणाला एका प्रकारच्या थर्मल रिझर्व्होएर जोडले गेले, ज्यामुळे त्या जागेचे तापमान असामान्यरित्या वाढले. हे तापमान मोजले असता, ते सूर्याच्या पृष्ठभागाच्या तापमानापेक्षा सुमारे 2000 पट अधिक असल्याचे आढळले. वैज्ञानिकांचा हा अभ्यास थर्मोडायनॅमिक्सला आव्हान देऊ शकतो. शाळा-महाविद्यालयांच्या पुस्तकांनुसार, कोणत्याही इंजिनची क्षमता एका मर्यादेपर्यंतच असू शकते. परंतु या संशोधनानुसार, हे मायक्रो इंजिन दर्शवते की लहान स्तरावर ऊर्जा आणि उष्णतेचे नियम बदलतात. धक्कादायक बाब म्हणजे, यात मोठे तापीय चढ-उतार दिसून आले.

यानुसार, पारंपरिक ब्राऊनियन गती आणि थर्मोडायनॅमिक्सचे नियम मागे पडताना दिसले. हे इंजिन केवळ एक वैज्ञानिक कुतूहल नाही, तर तज्ज्ञांचे मत आहे की या संशोधनामुळे भविष्यातील नॅनोटेक्नॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजीमध्ये मोठा बदल घडून येऊ शकतो. या शोधामुळे पेशींमध्ये ऊर्जा कशी कार्य करते, प्रोटीन्स कसे वळतात आणि जीवनाच्या मायक्रो प्रक्रिया कशा चालतात, याचा शोध घेता येऊ शकतो. हे संशोधन जानेवारी 2025 मध्ये arXiv वर प्रकाशित झाले होते. यात मॉली मेसेज, फेडेरिको सेरिसोल, जोनाथन डी. प्रिचेट, केटी ओ’फ्लिन, युगांग रेन, मुदस्सर रशीद, जॅनेट अँडर्स आणि जेम्स मिले यांसारख्या प्रमुख लेखकांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT