चेन्नई : भारतामध्ये दररोज सुमारे 13 हजार प्रवासी रेल्वे गाड्या धावतात आणि भारतीय रेल्वे ही जगातील चौथी सर्वात मोठी रेल्वे सेवा आहे. जिथे अनेक गाड्या 150 किलोमीटर प्रतितासपेक्षा अधिक वेगाने धावतात; पण भारतात अशी एक रेल्वे गाडी आहे जिचा वेग ऐकून लोक थक्क झाल्याशिवाय राहत नाहीत.
ही रेल्वे 5 तासांत केवळ 46 किलोमीटरचे अंतर पार करते, म्हणजेच तिचा सरासरी ताशी वेग सुमारे 9 किलोमीटर इतका आहे. ही संथ धावणारी रेल्वे निलगिरी माऊंटन रेल्वे असून, ती तामिळनाडूमधील मेट्टुपालयम ते ऊटी दरम्यान धावते. ही रेल्वे केवळ 46 कि.मी.चा प्रवास सुमारे 5 तासांत पूर्ण करते. मात्र डोंगर, बोगदे आणि हिरवळीच्या सान्निध्यातून होणारा हा प्रवास अतिशय सुंदर आणि अविस्मरणीय मानला जातो. ही रेल्वे तामिळनाडूच्या डोंगराळ भागातून धावते आणि ऊटी व कुन्नूरला जाणाऱ्या पर्यटकांची पहिली पसंती मानली जाते. विशेष म्हणजे ही रेल्वे इतकी लोकप्रिय आहे की तिची तिकिटे आधीच बुक करावी लागतात. या रेल्वे मार्गाचा प्रस्ताव 1854 मध्ये मांडण्यात आला होता.
अवघड डोंगराळ मार्ग आणि उंचीमुळे याचे बांधकाम 1891 मध्ये सुरू होऊन 908 मध्ये पूर्ण झाले. ही रेल्वे रॅक अँड पिनियन प्रणालीवर चालते, ज्यामुळे ती तीव चढही सहज पार करू शकते. या ऐतिहासिक आणि तांत्रिक वैशिष्ट्यांमुळेच या रेल्वेला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा देण्यात आला आहे.