विश्वसंचार

सात हजार वर्षांपूर्वीच्या माणसाचा सापडला सांगाडा

Arun Patil

लंडन : पोलंडमध्ये पुरातत्त्व संशोधकांनी तब्बल सात हजार वर्षांपूर्वीच्या माणसाचा पूर्ण स्थितीत असलेला सांगाडा शोधून काढला आहे. सध्याच्या क्रॅकोच्या भागात एकेकाळी ही व्यक्ती वावरत होती. स्लोमनिकीमधील एका चौकाच्या नूतनीकरणासाठी खोदकाम सुरू असताना हा सांगाडा अपघातानेच आढळला व त्यानंतर शास्त्रीय पद्धतीने उत्खनन करण्यात आले.

हा सांगाडा अत्यंत चांगल्या स्थितीत आढळला आहे. त्याच्या शेजारी काही भांड्यांचेही अवशेष सापडले. या मातीच्या भांड्यांची शैली व कलाकुसर पाहता ही दफनभूमी सात हजार वर्षांपूर्वीची असावी असे अनुमान काढण्यात आले. पॉवेल मिकिक यांनी याबाबतचे संशोधन केले. हा सांगाडा ज्या मातीत होता ती आम्लधर्मीय नसल्याने हा सांगाडा सुरक्षितपणे जतन राहिला, असे त्यांनी सांगितले. हा सांगाडा नेमका कुणाचा आहे हे समजू शकलेले नाही. या सांगाड्याची रेडियोकार्बन चाचणीही केली जाणार आहे जेणेकरून या व्यक्तीचा नेमका काळ समजू शकेल. सांगाड्यासोबत असलेल्या भांड्यांचे मात्र काळाच्या ओघात बरेच नुकसान झालेले आहे.

SCROLL FOR NEXT