विश्वसंचार

समुद्रातील तापमानवाढीमुळे घटतोय माशांचा आकार

Arun Patil

मेक्सिको : जागतिक तापमानवाढीचा फटका आता महासागरात देखील जाणवत चालला असून, तेथील तापमान वाढत आहे आणि त्यामुळे जगभरातल्या माशांचे आकार कमी होऊ लागले आहेत, असे एका संशोधनात आढळून आले आहे. माशांचे गिल्स म्हणजे श्वसनग्रंथी लहान होत आहेत आणि त्या जास्त ऑक्सिजन ग्रहण करू शकत नाहीत, यामुळे असे होत असल्याचे या अभ्यासात नमूद केले गेले आहे.

संशोधकांनी मांडलेल्या या सिद्धांताला गिल ऑक्सिजन लिमिटेशन थिअरी असे म्हटले जाते. यानुसार, समुद्रातील पाण्याचे तापमान वाढल्यामुळे माशांच्या श्वसनग्रंथींच्या पृष्ठभागाचा आकार कमी होत आहे. याच अभ्यासाला एमहर्स्टच्या मॅसाच्युसेट्स विद्यापीठातल्या (यूएमए) वैज्ञानिकांच्या संशोधनाने मात्र थेट आव्हान दिले आहे.

ब्रूक ट्राऊट नावाच्या माशांवर संशोधन करणार्‍या अभ्यासकांचं स्पष्ट म्हणणे आहे, की तापमानवाढीमुळे माशांचा आकार कमी होत आहे; पण याचा माशांच्या श्वसनग्रंथींच्या पृष्ठभागाचा आकार कमी होत असल्याशी काहीही संबंध नाही. यूएमएमधले जीवशास्त्राचे प्राध्यापक जोशुआ लोनथेअर हेदेखील तापमानवाढीचं कारण सांगत त्यामुळे होणार्‍या अनिश्चिततेवर ठाम आहेत. लोनथेअर यांचं म्हणणं आहे की, हवामानबदलामुळे आपले समुद्र आणि नद्यांचे तापमान वाढत आहे. याचा परिणाम असा होत आहे की, केवळ मासेच नाही तर अन्य प्राणीसुद्धा त्यांचे वय वाढेल तसे आकाराने लहान होऊ लागले आहेत. याला टेम्परेचर साईज रूल असे म्हणता येऊ शकते; मात्र कित्येक दशकांच्या संशोधनानंतर सुद्धा अद्याप याचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे.

SCROLL FOR NEXT