Heart attack treatment: हृदयविकाराच्या झटक्यानंतर एकाच इंजेक्शनने होणार ‌‘हार्ट रिपेअर‌’ Pudhari
विश्वसंचार

Heart attack treatment: हृदयविकाराच्या झटक्यानंतर एकाच इंजेक्शनने होणार ‌‘हार्ट रिपेअर‌’

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर हृदयाच्या स्नायूंचे होणारे नुकसान भरून काढणे हे वैद्यकीय क्षेत्रासमोर मोठे आव्हान असते

पुढारी वृत्तसेवा

न्यूयॉर्क : हृदयविकाराचा झटका आल्यानंतर हृदयाच्या स्नायूंचे होणारे नुकसान भरून काढणे हे वैद्यकीय क्षेत्रासमोर मोठे आव्हान असते. मात्र, आता एका नव्या संशोधनाने आशेचा किरण दाखवला आहे. ‌‘सेल्फ ॲम्प्लिफाईंग आरएनए‌’च्या केवळ एका इंजेक्शनमुळे हृदयाच्या खराब झालेल्या ऊतींची दुरुस्ती होऊ शकते, असे उंदीर आणि डुकरांवरील प्रयोगातून सिद्ध झाले आहे.

टेक्सास ए अँड एम युनिव्हर्सिटीचे सहायक प्राध्यापक डॉ. के हुआंग यांनी या प्रणालीला ‌‘क्रांतिकारी‌’ म्हटले आहे. त्यांच्या मते, हे इंजेक्शन दिल्यानंतर आपले सांगाडा स्नायू आपल्याला आवश्यक असलेल्या प्रथिनांची निर्मिती करणारी ‌‘फॅक्टरी‌’ म्हणून काम करतात. हृदयविकाराच्या झटक्यात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हृदयाचे स्नायू मृत पावतात, तिथे ‌‘स्कार टिश्यू‌’ (डाग) तयार होतात. हे डाग रक्त पंप करण्यास असमर्थ असतात, ज्यामुळे हार्ट फेल्युअरचा धोका वाढतो. हे तंत्रज्ञान सध्याच्या लसींसारखेच आहे, पण त्याहून थोडे प्रगत आहे. जेव्हा हे इंजेक्शन पायाच्या स्नायूंमध्ये दिले जाते, तेव्हा ते शरीराला ‌‘प्रो-एएनपी‌’ नावाचा रेणू तयार करण्याच्या सूचना देते. हा रेणू रक्ताद्वारे हृदयापर्यंत पोहोचतो आणि तिथे त्याचे रूपांतर ‌‘एट्रियल नॅट्रियुरेटिक पेप्टाईड‌’ (ANP) या नैसर्गिक हार्मोनमध्ये होते.

साधेmRNA काही दिवसांत नष्ट होते, पण ‌saRNA स्वतःच्या प्रतिलिपी तयार करतो, ज्यामुळे शरीरात सुमारे चार आठवड्यांपर्यंत आवश्यक प्रथिनांची निर्मिती सुरू राहते. 5 मार्च रोजी ‌‘सायन्स‌’ या नामांकित जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासानुसार, नवजात बालकांमध्ये ANP हार्मोनचे प्रमाण जास्त असते, जे हृदयाच्या विकासात मदत करते. कोलंबिया युनिव्हर्सिटीचे बायोमेडिकल इंजिनिअर के चेंग यांनी सांगितले की, हृदयापर्यंत थेट औषध पोहोचवणे कठीण असते, म्हणून आम्ही स्नायूंचा वापर करून रक्ताद्वारे हृदयावर उपचार करण्याची ही पद्धत शोधली आहे. जरी अद्याप या इंजेक्शनची मानवी चाचणी झालेली नसली तरी, भविष्यात हृदयविकाराच्या रुग्णांसाठी हे वरदान ठरू शकते. यामुळे शस्त्रक्रियेशिवाय हृदयाची नैसर्गिक दुरुस्ती करणे शक्य होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT