युद्धभूमीत ‘स्वाम ड्रोन’ का ठरतोय सर्वात भयानक शस्त्र? 
विश्वसंचार

Drone Technology : एक बटन दाबताच उडणार ड्रोनचे वादळ

युद्धभूमीत ‘स्वाम ड्रोन’ का ठरतोय सर्वात भयानक शस्त्र?

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : आजच्या काळात युद्धाच्या पद्धती झपाट्याने बदलत आहेत. आता थेट आकाशात लढाऊ विमाने पाठवण्याऐवजी एका मोठ्या ‘मदरशिप’मधून शेकडो लहान ड्रोन्सची झुंड म्हणजेच ‘ड्रोन स्वाम’ शत्रूवर हल्ला करण्यासाठी सोडला जातो. जरा विचार करा, जर शत्रूने सीमेवर जीपीएस किंवा संपूर्ण नेटवर्क जाम केले, तरीही हे ड्रोन्स भरकटल्याशिवाय आपले काम कसे करतील? लडाखच्या खडतर टेकड्यांपासून ते समुद्राच्या किनाऱ्यांपर्यंत भारत आता स्वतःला या आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज करत आहे. भारताची ड्रोन क्षमता आज कुठे आहे आणि भविष्यातील युद्धात हे छोटे ड्रोन्स खरोखरच महागड्या फायटर जेटस्‌ची सुट्टी करतील का, हे समजून घेऊया.

पूर्व लडाखमध्ये २०२० मध्ये चीनसोबत झालेल्या तणावानंतर भारताला समजले की दुर्गम टेकड्यांवर २४ तास लक्ष ठेवणे माणसांच्या आवाक्याबाहेरचे आहे. म्हणूनच आता भारत सरकार देशांतर्गत उत्पादकांना २ अब्ज डॉलरपेक्षा (सुमारे १९,००० कोटी रुपये) अधिकच्या विक्रमी ड्रोन ऑर्डर्स देण्याच्या तयारीत आहे. हे ड्रोन्स चीन सीमा (LAC), पाकिस्तान, बांगला देश सीमा आणि हिंदी महासागरात पाळत ठेवणे, रसद पोहोचवणे आणि अचूक हल्ला करण्यासाठी वापरले जातील. भारत आता फक्त पाळत ठेवणारे छोटे ड्रोन्सच बनवत नाही, तर जड वजन वाहून नेणारे ‘लॉजिस्टिक्स ड्रोन्स’ही विकसित करत आहे. उदाहरणार्थ, ‘एंड्युरएयर सिस्टम्स’चा ‘सबल-२०’ हा लॉजिस्टिक्स ड्रोन अमेरिकेच्या प्रसिद्ध बोइंग चिनूक हेलिकॉप्टरच्या डिझाईनवरून प्रेरित आहे. यामध्ये दोन पंखे (टँडम-रोटर) बसवले आहेत, जे डोंगराळ भागातील विरळ हवेतही जड वजन उचलू शकतात. हा पूर्णपणे स्वदेशी (६५% स्थानिक सुटे भाग) आहे. त्याचे वजन ४० ते ६० किलो असून पेलोड क्षमता १० ते २० किलो (कमाल क्षमता ७० किलोपर्यंत) आहे. त्याची रेंज १० किलोमीटरची आहे. त्याच्या उड्डाणाचा वेळ ४० मिनिटांपर्यंत आहे.

एका मोठ्या विमानाला किंवा विशाल ड्रोनला ‘मदरशिप’ म्हटले जाते, जे स्वतःच्या पोटात अनेक लहान-लहान ड्रोन्स वाहून नेते. आकाशात पोहोचल्यानंतर हे मदरशिप या लहान ड्रोन्सना मुक्त करते. १५ जानेवारी २०२१ रोजी पार पडलेल्या आर्मी डे परेडमध्ये भारताने पहिल्यांदाच स्वदेशी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाने सज्ज अशा ७५ स्वाम ड्रोन्सचे (झुंड ड्रोन्स) प्रात्यक्षिक दाखवले होते. यामध्ये सहा पंखे असणारा एक ‘मदरशिप ड्रोन’ समाविष्ट होता, ज्याने चार पंखे असणाऱ्या लहान-लहान ‘कामिकेझी’ (आत्मघाती) ड्रोन्सना हवेत सोडले. या ड्रोन्सनी उपग्रह (सॅटेलाईट) आणि नेटवर्कच्या माध्यमातून परस्परांशी उत्तम तालमेल साधत शत्रूच्या १३ ठिकाणांना (टँक, रडार, आणि लपण्याच्या जागा) एकाच वेळी उद्ध्वस्त करून दाखवले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT