Death prediction test | ‘या’ साध्या चाचणीमुळे मृत्यूचे 24 तासांत भाकीत शक्य 
विश्वसंचार

Death prediction test | ‘या’ साध्या चाचणीमुळे मृत्यूचे 24 तासांत भाकीत शक्य

वैद्यकीय क्षेत्रातील मोठी प्रगती; ९५ टक्‍के अचूकतेचा डॉक्टरांचा दावा

पुढारी वृत्तसेवा

लंडन : एखाद्या गंभीर आजारी रुग्णाच्या आयुष्यातील शेवटचे २४ तास उरले आहेत का? हे आता डॉक्टर एका साध्या 'बेडसाईड' चाचणीद्वारे सांगू शकणार आहेत. दक्षिण कोरियातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार, डोळ्यांच्या एका विशिष्ट प्रतिसादावरून (रिफ्‍लेक्‍स) मृत्यूची वेळ ओळखणे सोपे होणार आहे.

काय आहे ही ‘कॉर्नियल रिफ्लेक्स’ चाचणी?

‘कॉर्नियल रिफ्लेक्स’ या चाचणीमध्ये रुग्णाच्या डोळ्याच्या बाहुलीला (कॉर्निया) कापसाच्या बोळ्याने किंवा निर्जंतुक कापडाने हलकेच स्पर्श केला जातो. सामान्यतः, स्पर्श होताच डोळ्यांची उघडझाप (Blink) होते, यालाच ‘कॉर्नियल रिफ्लेक्स’ म्हणतात. ज्या रुग्णांमध्ये हा प्रतिसाद पूर्णपणे बंद झाला आहे, त्यांचा मृत्यू पुढील २४ तासांत होण्याची शक्यता सर्वाधिक असते. संशोधक डॉ. जंग हुन कांग यांच्या मते, हा प्रतिसाद बंद होणे म्हणजे मेंदूच्या ‘ब्रेनस्टेम’ (Brainstem) या भागाचे कार्य थांबत असल्याचे लक्षण आहे. हा भाग श्वासोच्‍छ्‌वास आणि शुद्धीवर असण्याचे नियंत्रण करतो.

नातेवाईकांसाठी का महत्त्वाचे?

अंतिम टप्प्यातील उपचारांमध्ये नातेवाईकांचा सर्वात महत्त्वाचा प्रश्‍न असतो की, ‘रुग्णाकडे आता किती वेळ उरला आहे?’ जर मृत्यू जवळ आला आहे हे आधीच समजले, तर कुटुंबाला त्यांच्या प्रिय व्यक्‍तीसोबत शेवटचे काही क्षण घालवता येतील आणि मानसिक तयारी करता येईल. रुग्णाला शांत आणि सन्मानजनक मृत्यू मिळावा, यासाठी डॉक्टर आवश्यक ते निर्णय घेऊ शकतील.

अमेरिकेतील ‘एमडी अँडरसन कॅन्सर सेंटर’चे डेव्हिड हुई यांनी सांगितले की, हे संशोधन महत्त्वाचे असले तरी ते सध्या केवळ प्रगत कॅन्सर असलेल्या रुग्णांवर करण्यात आले आहे. इतर आजारांच्या रुग्णांमध्ये हे किती लागू पडते, यासाठी अधिक मोठ्या प्रमाणावर चाचण्या होणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT