लंडन : पोलंडमधील पुरातत्त्व संशोधकांनी चौथ्या शतकातील दफनभूमीमध्ये असलेल्या थडग्यांमधून चांदीचे दागिने आणि अन्य काही वस्तू शोधून काढल्या आहेत. त्यामध्ये दोन चांदीचे नेकलेस व दोन चांदीचे ब्रूच आहेत. तसेच अन्य एका नेकलेसचे पदकही मिळाले आहे. पोलंडच्या वाडा नदीकाठी करण्यात आलेल्या उत्खननात ही दफनभूमी आणि दागिने सापडले.
ओलाफ पॉपकिविक्झ यांनी याबाबतची माहिती दिली आहे. उत्खनन केलेले हे ठिकाण मध्य-उत्तर भागातील आहे. गॉथिक काळातील ही दफनभूमी आहे. तीन आठवड्यांच्या काळात संशोधकांनी 250 चौरस मीटरच्या जागेत हे उत्खनन करण्यात आले. त्यामध्ये गॉथिक काळातील 50 थडगी सापडली. याठिकाणी त्या काळातील दफनभूमीच होती असे यावरून दिसून आले. तिथे थडग्यांमध्ये ठेवल्या जाणार्या अनेक वस्तूही सापडल्या आहेत.
या वस्तू मृतदेहाचे दफन करीत असताना त्याच्या शेजारी ठेवल्या जात होत्या. त्यामध्ये मातीची भांडी, ब्रूच, अम्बरचे मणी आणि अनेक प्रकारच्या दागिन्यांचा समावेश आहे. 'गॉथ' हे लोक जर्मन वंशाचे आदिवासी होते. ते स्कँडिनावियामधून स्थलांतरित होऊन इसवी सनाच्या पहिल्या शतकात युरोपमध्ये स्थिरावल्याचे मानले जाते. याच लोकांची ही दफनभूमी आहे.