मंगळावर जीवसृष्टीचे संकेत 
विश्वसंचार

Life on Mars : मंगळावर जीवसृष्टीचे संकेत ः खडकामध्ये आढळले सेंद्रिय रेणू

नासाच्या संशोधकांनी व्यक्त केली शक्यता

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : नासाच्या नेतृत्वाखालील एका संशोधक गटाने मंगळ ग््राहावरील खडकांमध्ये गुंतागुंतीचे सेंद्रिय रेणू शोधले असून, त्यांची निर्मिती केवळ निर्जीव प्रक्रियांनी होणे कठीण असल्याचे म्हटले आहे. ‌‘ॲस्ट्रोबायोलॉजी‌’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधानुसार, हे रेणू सजीवांद्वारे तयार झाले असावेत, असा तर्क लावणे ‌‘तर्कसंगत‌‘ आहे. मात्र, हा मंगळावर जीवसृष्टी असल्याचा निर्णायक पुरावा नाही, असा इशाराही शास्त्रज्ञांनी दिला आहे.

मार्च 2025 मध्ये शास्त्रज्ञांनी मंगळावर आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या सेंद्रिय रेणूंच्या शोधाची घोषणा केली होती. हे रेणू म्हणजे हायड्रोजन आणि कार्बनच्या लांब साखळ्या असून त्या ‌‘फॅटी ॲसिडस्‌‍‌’चे अवशेष असू शकतात. पृथ्वीवर अशा साखळ्या प्रामुख्याने जैविक प्रक्रियेतूनच निर्माण होतात. हे रेणू मंगळावरील ‌‘यलोनाईफ बे‌’ नावाच्या प्राचीन सरोवराच्या तळाशी असलेल्या ‌‘कंबरलँड मडस्टोन‌’ या खडकात सापडले आहेत. नासाच्या ‌‘क्युरिओसिटी‌’ रोव्हरने 2013 मध्ये या खडकात छिद्र पाडून नमुने घेतले होते. शास्त्रज्ञांनी जेव्हा हे नमुने 1,100 अंश सेल्सिअस (2,012ॅ ऋ) पर्यंत तापवले, तेव्हा त्यांना प्रथिनांच्या घटकांऐवजी हे अजस्त्र सेंद्रिय रेणू सापडले. हे रेणू ‌‘अल्केन्स‌’ गटातील असून त्यात 10 ते 12 कार्बन अणूंच्या लांब साखळ्या आहेत. मिथेन आणि प्रोपेन याच गटातील असले तरी, मंगळावर सापडलेले हे रेणू त्यापेक्षा कितीतरी अधिक मोठे आणि गुंतागुंतीचे आहेत. संशोधकांनी गणितीय मॉडेल्स आणि रेडिओलिसिस (विकिरणांमुळे रेणूंचा होणारा ऱ्हास) प्रयोगांचा वापर करून अब्जावधी वर्षांपूर्वीचा काळ तपासून पाहिला. त्यांच्या विश्लेषणानुसार, 12 किंवा त्यापेक्षा जास्त कार्बन अणूंच्या साखळ्या जैविक प्रक्रियेतून निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. अजैविक प्रक्रियेतून इतक्या मोठ्या प्रमाणात आणि अशा प्रकारचे रेणू तयार होणे पूर्णपणे स्पष्ट करता येत नाही. जरी हे रेणू जीवसृष्टीकडे बोट दाखवत असले, तरी शास्त्रज्ञ अजूनही सावध आहेत. हे रेणू मंगळावरील एखाद्या भूगर्भीय किंवा रासायनिक प्रक्रियेतूनही तयार झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. क्युरिओसिटी रोव्हरमधील ‌‘सॅम्पल अनालिसिस ॲट मार्स‌’ या प्रयोगशाळेद्वारे यावर अधिक संशोधन सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT