न्यूयॉर्क : आकाशाकडे पाहून आपल्यापैकी अनेकांना प्रश्न पडतो की, आपल्या सूर्यमालेत पृथ्वीव्यतिरिक्तआणखी कुठे जीवसृष्टी असू शकते का? वैज्ञानिक या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी विविध ग्रहांवर आणि त्यांच्या चंद्रांवर संशोधन करत आहेत. सध्याच्या माहितीनुसार, काही ठिकाणी जीवसृष्टीचे संकेत मिळत आहेत; परंतु अद्याप कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही. मात्र, भविष्यातील मोहिमा आणि नमुन्यांच्या सखोल अभ्यासातून या प्रश्नाचे उत्तर मिळू शकेल. याचवेळी सध्या प्राथमिक संशोधातून विविध ग्रह अणि त्यांच्या चंद्रांविषयी मिळणारी माहितीही मनोरंजक आणि उत्सुकता वाढविणारी आहे.
मंगळ ग्रह आता जरी एक थंड वाळवंट असला, तरी अनेक पुराव्यांनुसार भूतकाळात तिथे पाणी होते. नासाच्या ‘क्यूरिओसिटी’ आणि ‘पर्सेव्हरन्स’ या रोव्हर्सनी मंगळावरील खडकांचा अभ्यास केला असून, तिथे जीवनासाठी आवश्यक घटक - कार्बन आणि रासायनिक ऊर्जा - अस्तित्वात असल्याचा अंदाज आहे. पर्सेव्हरन्स रोव्हरने काही नमुने गोळा केले आहेत, जे पृथ्वीवर परत आणून तपासले जाणार आहेत.
शुक्र ग्रह आपल्या तापमानामुळे आणि अत्यंत विषारी वातावरणामुळे जीवसृष्टीसाठी प्रतिकूल मानला जातो. मात्र, त्याच्या पृष्ठभागापासून वरच्या थरात, जिथे तापमान आणि दाब कमी आहे, तिथे सूक्ष्मजीव असू शकतात अशी शक्यता आहे. 2020 मध्ये शुक्राच्या ढगांमध्ये ‘फॉस्फाईन’ वायूचे संकेत आढळले होते, जो पृथ्वीवर सजीवांमधून तयार होतो.
शनी आणि गुरू ग्रहांचे काही चंद्र जीवसृष्टीसाठी अनुकूल मानले जातात.
युरोपा : गुरूचा युरोपा हा चंद्र बर्फाच्या जाड थराने झाकलेला आहे आणि त्याच्या पृष्ठभागाखाली एक मोठा महासागर असल्याचा अंदाज आहे. नासाचे ‘युरोपा क्लिपर’ मिशन तिथे जीवनासाठी आवश्यक परिस्थिती आहे का, याचा अभ्यास करणार आहे.
एन्सेलेडस : शनीचा एन्सेलेडस हा चंद्र देखील बर्फाच्या आत महासागर बाळगून आहे. अलीकडेच, शास्त्रज्ञांना त्याच्या महासागरात जीवनासाठी आवश्यक असलेले सर्व रासायनिक घटक सापडले आहेत.
टायटन : शनीचा टायटन हा चंद्र पृथ्वीसारखा मिथेन चक्र आणि जाड वातावरण बाळगून आहे.
बटू अर्थात लघुग्रह सेरेस : मंगळ आणि गुरू ग्रहांच्या मध्ये असलेल्या बटू ग्रह सेरेसवर पूर्वी जीवनासाठी अनुकूल परिस्थिती होती. ‘नासा’च्या ‘डॉन’ मिशनने पाठवलेल्या माहितीनुसार, तिथेही पाणी आणि जीवनासाठी आवश्यक असलेले कार्बनिक पदार्थ सापडले आहेत.