वॉशिंग्टन : मंगळ ग्रह आज जरी एक थंड आणि शुष्क वाळवंट असला, तरी अब्जावधी वर्षांपूर्वी तिथे जीवसृष्टीसाठी अनुकूल वातावरण अस्तित्वात होते का? या प्रश्नाचे उत्तर आता लाल ग्रहाच्या मातीतच दडलेले असू शकते. एका नवीन अभ्यासानुसार, मंगळावर आढळणारे चिकणमातीचे जाड आणि खनिज-समृद्ध थर हे सूचित करतात की, या ग्रहावर प्राचीन काळात दीर्घकाळापर्यंत जीवसृष्टीसाठी पोषक वातावरण होते.
चिकणमाती (Clay) तयार होण्यासाठी द्रवरूप पाण्याची आवश्यकता असते. मंगळावर सापडलेले हे थर शेकडो फूट जाड असून, सुमारे 3.7 अब्ज वर्षांपूर्वी तयार झाले असावेत, असे मानले जाते. त्यावेळी मंगळावरील हवामान आजच्या तुलनेत अधिक उष्ण आणि दमट होते. या अभ्यासाच्या सहलेखिका आणि टेक्सास विद्यापीठाच्या जॅक्सन स्कूल ऑफ जिओसायन्सेसच्या पोस्टडॉक्टरल फेलो, र्हियाना मूर यांनी एका निवेदनात म्हटले आहे, ‘आम्ही अभ्यास केलेल्या भागांमध्ये भरपूर पाणी होते. परंतु, जास्त भूपृष्ठीय हालचाल नव्हती, त्यामुळे ते अत्यंत स्थिर होते.
जर भूभाग स्थिर असेल, तर संभाव्य वस्तीयोग्य वातावरणात कोणताही अडथळा येत नाही. अशा स्थितीत अनुकूल परिस्थिती अधिक काळ टिकून राहू शकते.’ या संशोधनामुळे मंगळावरील जीवसृष्टीच्या शक्यतेबद्दलच्या चर्चांना पुन्हा एकदा बळ मिळाले आहे. आपल्या पृथ्वीवरही अशा प्रकारचे चिकणमातीचे साठे विशिष्ट हवामान आणि भूप्रदेशात तयार होतात. जॅक्सन स्कूलच्या पृथ्वी आणि ग्रह विज्ञान विभागातील सहायक प्राध्यापक आणि सहलेखक टीम गॉज यांच्या मते, ‘पृथ्वीवर ज्या ठिकाणी चिकणमातीच्या खनिजांचे सर्वात जाड थर आढळतात, ते सामान्यतः दमट वातावरणात आणि कमीत कमी भौतिक झीज होणार्या ठिकाणी असतात.’ मात्र, मंगळाची स्थानिक आणि जागतिक भूरचना, तसेच त्याच्या भूतकाळातील हवामानातील बदलांनी पृष्ठभागावरील झीज आणि चिकणमातीच्या थरांच्या निर्मितीवर नेमका कसा प्रभाव टाकला, हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही.
या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी मूर, गॉज आणि त्यांच्या सहकार्यांनी ‘नासा’च्या मार्स रिकनायसन्स ऑर्बिटरकडून मिळालेल्या डेटा आणि प्रतिमांचा वापर केला. या ऑर्बिटरने मंगळाभोवती सर्वाधिक काळ कार्यरत राहण्याचा विक्रम केला आहे. संशोधकांनी चिकणमातीच्या 150 वेगवेगळ्या साठ्यांचा अभ्यास केला, त्यांचे आकार, स्थान आणि प्राचीन तलाव किंवा नद्यांपासूनचे त्यांचे अंतर तपासले. या अभ्यासात काही महत्त्वाचे मुद्दे समोर आले. चिकणमातीचे साठे बहुतेक प्राचीन तलावांजवळील सखल, सपाट भागात आहेत. हे साठे ज्या खोर्यांमधून पाणी वेगाने वाहत होते, त्यांच्या जवळ आढळले नाहीत. यावरून असे दिसून येते की, या ठिकाणी सौम्य रासायनिक बदल आणि कमी तीव्रतेची भौतिक झीज झाली, ज्यामुळे ही चिकणमाती हजारो वर्षांपासून टिकून राहिली. ‘नेचर अॅस्ट्रॉनॉमी’ या प्रतिष्ठित जर्नलमध्ये याबाबतची माहिती प्रसिद्ध झाली आहे.